पाडळसा ग्रामसभेत वादळी चर्चा !! विकासकामे,घरकुल यादी,स्मशानभूमी स्वच्छता आणि शाळा प्रवेशावर महत्त्वपूर्ण ठराव !!
जि.प.मराठी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करणाऱ्यांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ-ठराव बहुमताने मंजूर
पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील जनरल ग्रामसभा दि.२८ मे मंगळवार रोजी सकाळी ९:३० वाजता पाडळसे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वादळी वातावरणात पार पडली.सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ग्रामसभेला गावातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते जिथे अनेक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले.
क्रीडांगणाच्या कामावरून संतप्त सवाल
ग्रामस्थ सुरज कोळी यांनी गेल्या अनेक ग्रामसभांपासून चर्चेत असलेल्या गावातील क्रीडांगणाच्या सपाटीकरणाचा मुद्दा ठामपणे मांडला.तसेच प्रत्येक ग्रामसभेत क्रीडांगणाच्या कामाला मंजुरी दिली जाते पण प्रत्यक्षात कोणतेच काम सुरू होत नाही व ही फक्त औपचारिक मंजुरी की जनतेची फसवणूक ? असा थेट सवाल सुरज कोळी यांनी यावेळी केला यावर सरपंच उत्तर देतांना क्रीडांगणाच्या सपाटीकरणाच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे सरपंच गुणवंती पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या अपात्रतेवरून गोंधळ
ग्रामसभेतील सर्वात वादग्रस्त विषय ठरला तो पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील ४५ लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय व यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.तर अपात्र ठरवण्याची प्रक्रिया पारदर्शक नव्हती असा आरोप काही नागरिकांनी केला यावर काही काळ गोंधळ निर्माण झाला.
माजी सरपंचांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले तसेच ग्रामसभा ही ग्रामस्थांच्या हक्कासाठी असून दबावखोर नेत्यांसाठी नाही.कोणत्याही प्रकारच्या धमकीला ग्रामस्थ घाबरणार नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधान आणि लोकशाही अधिकाराचा आम्ही योग्य वापर करू असे त्यांनी ठणकावून सांगितले.दरम्यान त्यांनी उपस्थित सत्ताधाऱ्यांना इशारा दिला की,“जे नागरिक तुम्हाला खुर्चीवर बसवतात तेच तुम्हाला खुर्चीच्या खाली उतरवू शकतात याचा विसर पडू नये.”
स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि इतर मागण्या
माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता आणि नियमित देखभालीकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षावरही नाराजी व्यक्त केली.स्मशानभूमी ही गावाच्या संस्कृतीचा भाग असून तिथे साफसफाई आणि योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे याबाबत ग्रामपंचायतीने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.यासोबतच गावातील एकूण स्वच्छता व्यवस्थेकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच गावाचे आराध्य दैवत श्री.भिल्लटबाबा देवस्थानाकडे जाणारा १५ लाख रुपयांचा रस्ता १५ व्या वित्त आयोगातून करण्यात यावा असा अर्ज सभेत मंजूर करण्यात आला.
शाळा प्रवेशावर महत्त्वपूर्ण ठराव
माजी सरपंच खेमचंद कोळी यांनी जि.प.मराठी शाळेत आपल्या पाल्याचे शिकण्यासाठी नाव दाखल करतील त्यांचे पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करण्याचा ठराव मांडला व हा ठराव बहुमताने ग्रामस्थांनी मंजूर केला आहे.दरम्यान ग्रामस्थांच्या सजग सहभागामुळे ही ग्रामसभा प्रभावी ठरली.आता या सर्व मुद्द्यांवर ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.