यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जून २५ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा सह परिसरात आज दि.६ जून शुक्रवार रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यात डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या खळ्यात बांधलेल्या बैलावर लिंबाचे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने सदर बैलाचे कंबरडे मूडून पडले आहे.तर डोंगर कठोरा सह परिसरात केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान आज दि.६ जून शुक्रवार रोजी २.३० वाजेच्या सुमारास डोंगर कठोरासह परिसरात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.सदरील पाऊस इतका जोरदार होता की यात येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या खळ्यात असलेले जुने लिंबाचे झाड उन्मळून पडले.सदरहू लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर सदरील झाडच पडल्यामुळे या बैलाचे कंबरडे मुडले असून सदरील बैल सरपंच नवाज तडवी यांनी गेल्या ८ दिवसापूर्वीच ४८ हजार रुपयांना विकत आणला होता हे विशेष !.सदरहू नवाज तडवी यांच्या बैलाचे कंबरडे मुडल्यामुळे ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला खीळ बसली आहे.दरम्यान तलाठी गजानन पाटील व पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे काम करून घेतले असून पुढील कार्यवाही साठी अभिप्राय पुढील स्तरावर पाठविण्यात आला आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नुकसानीबद्दल त्यांना शासनाकडून तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.तसेच या वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात केळी पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात असून यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकनुकसानीबद्दल मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.