बुधगाव-अनवर्दे बस आगारातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे जीवन वाऱ्यावर !! चोपडा आगारातून बसेस सोडण्याची मागणी !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२४ जून २५ मंगळवार
सध्या छत्रपती संभाजी नगर-इंदूर हायवे चे काम चालू असून सदरील काम सुरु असल्याच्या कारणावरून बुधगाव-अनवर्दे या गावांना चोपडा आगारातून जाणारी बस बंद करण्यात आलेली आहे. सदरहू सदरील बंद केल्यामुळे येथील विद्यार्थी व गावकऱ्यांची चांगलीच वाताहत झाली असून फार मोठा मनस्ताप विद्यार्थी व गावकऱ्यांना सोसावा लागत आहे.
दरम्यान काल हातेड-अनवर्दे व बुधगाव परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे काल सोमवार रोजी विद्यार्थी व प्रवाशी वर्गाला फार हाल सोसावे लागले.काल सहा वाजेपर्यंत बस स्थानकातून बस सोडण्यात आली नाही.तसेच ड्रायव्हर व कंडक्टर नसल्याची बतावणी बस स्थानकातून करण्यात आली.दरम्यान विद्यार्थी व प्रवाशी वर्गानेही आक्रमक पवित्रा घेत आगारातून बस सोडल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर नाईलाजास्तव आगारातून बस सोडण्यात आली खरी मात्र सदरील बस फक्त हातेड पर्यंत सोडण्यात आली व पुढील प्रवासाला जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना तेथेच उतरवुन देण्यात आले.प्रसंगी पोलीस नायक तालुका प्रतिनिधी महेश बोरसे यांनी यावेळी मध्यस्थी करीत पाऊस न पडलेल्या ठिकाणापर्यंत बस सोडण्याबाबत सांगितल्यानुसार हातेड पर्यंत बस नेण्यात आली.यावेळी मात्र घोडगाव,वाळकी,अनवर्दे व बुधगाव जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरवून घोडगाव,वाळकी,अनवर्दे व बुधगाव या मार्गे बसेस सुरु करण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशी वर्गातून करण्यात आली आहे.