डोंगरकठोरा येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषिदिन उत्साहात साजरा !! मान्यवरांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जुलै २५ मंगळवार
तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.१ जुलै मंगळवार रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महसूल,पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच नवाज तडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,तालुका कृषी अधिकारी भरत वारे,कृषी वैज्ञानिक अतुल पाटील(सातपुडा कृषी तंत्रज्ञान केंद्र,पाल),सागर महाजन (सहकार तालुका अध्यक्ष) आणि माजी पंचायत समिती उपसभापती शेखर पाटील,सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ जंजाळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तर नंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आपले मनोगत व्यक्त करतांना कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असल्याने त्यांनी शेती करतांना स्वतः घेतलेला अनुभव व्यक्त करतांना शेतकरी बांधवांबाबत त्यांच्या अडीअडचणी व समस्या विशद करून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या.तसेच शेती करतांना घ्यावयाची काळजी,खतांचा वापर,शेती नापिकीकरण टाळण्यासाठी ‘उघडा डोळे’ म्हणत शेती करतांना योग्य पद्धती वापरण्याचा मोलाचा सल्ला दिला.त्याचबरोबर शाश्वत शेती,दुबार पीक पद्धतीचा अवलंब,ईपीक पाहणीमध्ये योग्य पिकाची नोंद,शेतकरी ओळखपत्र,बदलत्या हवामानातील शेती,कीड-रोग नियंत्रण,उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान व वैज्ञानिक व आधुनिक शेती अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.प्रसंगी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी यावेळी केले.परिणामी त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन आधुनिक शेतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.
तर गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे,शेती करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी,खतांचे नियोजन,सेंद्रिय शेतीचे महत्त्व,नैसर्गिक घटकांचा योग्य वापर व दीर्घकालीन जमिनीच्या आरोग्याचे फायदे यावर सविस्तर आणि प्रभावी मार्गदर्शन केले.तसेच कृषी अधिकारी भरत वारे यांनी आपल्या प्रास्ताविकात कृषी दिनाचे महत्व व रूपरेषा यावर मार्गदर्शन केले.कृषी वैज्ञानिक अतुल पाटील यांनी पीक उत्पादनाबाबतच्या गरजा,माती नमुना घेण्याची पद्धत,पीक फवारणी,जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व,सेंद्रिय व सेंद्रियेतर घटकांचा वापर,तंत्रशुद्ध शेती व पाण्याचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.तसेच अतुल पाटील यांनी भविष्यात जमिनीतील एनपीके हा ३१ वर्षानंतर संपणार असल्याची भीती व्यक्त करत भविष्यातील पुढील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.तर माजी पंचायत समिती उपसभापती शेखर पाटील यांनी कृषी दिनाच्या धर्तीवर तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करण्यासोबत शेतकऱ्यांनी देखील हिरीरीने सहभागी होऊन सहयोग देण्याचे आवाहन यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंचायत समिती कृषी अधिकारी इ के चौधरी यांनी केले.
यावेळी सरपंच नवाज तडवी,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी गजानन पाटील,कृषी सहाय्यक एस आर पवार,ग्रामविकास अधिकारी एम टी बगाडे,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,कल्पना पाटील,विकास सोसायटी चेअरमन चंद्रकांत भिरूड,यदुनाथ पाटील,विजय आढाळे,डिगंबर खडसे,प्रदीप पाटील,कल्पेश कोल्हे,पवन राणे,रुपेश पाटील,भोजराज पाटील,प्रकाश भिरूड,पुरुषोत्तम ठोंबरे,संजय आढाळे,अमोल पाटील,प्रवीण गाजरे,पद्माकर कोळी,छब्बीर तडवी,विनोद राणे,गुणवंत चौधरी,पंडित झांबरे,तुषार झोपे,सुपडू तडवी,संजय सरोदे,रजनी झांबरे,कीर्ती महाजन,प्रतिभा पाटील,हर्षदा कोलते,विद्या गाजरे यांच्यासह महसूल,पंचायत समिती व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महसूल,पंचायत समिती व कृषी विभागातील सर्व ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.दरम्यान महसूल विभाग,पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या समन्वयातून राबवलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी माहिती मिळाली असून शाश्वत,आधुनिक व वैज्ञानिक शेतीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळाले असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आली आहे.