चुंचाळे परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !! वन विभागाकडून गस्त वाढवण्याची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जुलै २५ बुधवार
तालुक्यातील चुंचाळे शिवारात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राण्याचा त्याच्या परिवारासह वावर असल्याचे समोर आले आहे व यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दि.७ जुलै सोमवार रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शेतकरी संजय फिरके आणि त्यांचा मुलगा शेतात फवारणीसाठी पाण्याच्या टाक्या भरून परत येत असतांना त्यांना प्रकाश रामदास चौधरी यांच्या शेतातून रस्त्यावर बिबट्या सदृश प्राण्यांचा एक परिवार दिसला.प्रसंगावधान राखून त्यांनी दूरवरूनच त्यांचा फोटो काढला आणि ते प्राणी रस्त्यावरून दूर होईपर्यंत थांबून राहिले.फिरके यांच्या माहितीनुसार दोन प्राणी रस्त्यावर होते तर अन्य दोन रस्त्याच्या कडेला थांबले होते व त्यांनी पाहिलेले प्राणी बिबटेच असल्याचा त्यांचा दावा आहे.
वन विभागाचा दुजोरा नाही पण नागरिकांचा दावा कायम !!
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे आर.एफ.ओ.सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.ठशांची तपासणी केल्यानंतर वन विभागाच्या पथकाचे म्हणणे आहे की हे प्राणी बिबट्या नसून तडस आहेत.मात्र प्रत्यक्षदर्शी संजय फिरके आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाहिलेले प्राणी बिबट्याच असल्याचे म्हटले आहे त्यामुळे वन विभागाच्या निष्कर्षाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
विद्यालयाकडून वन विभागाला निवेदन !!
श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.जी.तेली आणि अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना लेखी निवेदन देऊन या बिबट्या सदृश प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.
वन विभागाकडून उपाययोजनांचे आश्वासन !!
सहाय्यक वनरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) समाधान पाटील यांनी सांगितले की,काल दि.८ जुलै मंगळवार रोजी संध्याकाळपर्यंत वन विभागाचे एक पथक पुन्हा गावात पाठवले तसेच चौकाचौकात आणि गावातील माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि त्यांच्यापासून सुरक्षित राहण्याबद्दल जनजागृती केली जाईल.
नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन !!
* एकटे बाहेर पडणे टाळा: विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर एकटे जाणे टाळा. शक्यतो गटाने प्रवास करा.
* प्रकाश स्रोतांचा वापर करा: रात्री बाहेर पडताना सोबत टॉर्च किंवा इतर प्रकाश स्रोतांचा वापर करा.
* पाळीव जनावरांची काळजी घ्या: रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांना सुरक्षित गोठ्यात किंवा बंदिस्त ठिकाणी ठेवा.
* शौचालयांसाठी सुरक्षित उपाय: घराबाहेर शौचास जाणे टाळा, शक्य असल्यास घरातच शौचालयाची सोय करा.
* शेतात काम करताना दक्षता: सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा शेतात काम करताना विशेष काळजी घ्या. आजूबाजूला लक्ष ठेवा.
* गैरसमज टाळा: बिबट्या दिसल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्याजवळ जाऊ नका.
* तत्काळ माहिती द्या: बिबट्या किंवा अन्य वन्यजीव दिसल्यास तात्काळ वन विभागाला किंवा पोलिसांना माहिती द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका.
वन विभागाने गस्त वाढवणे आवश्यक:
चुंचाळे परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर लक्षात घेता, वन विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
* परिसरात गस्त वाढवून वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.
* शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
* शक्य असल्यास, कॅमेरा ट्रॅप लावून प्राण्याचा प्रकार निश्चित करावा आणि त्यानुसार पुढील कारवाई करावी.
* नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी वन विभागाने अधिक सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे.