मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला असून मैदान जिंकून काही तास उलटत नाहीत तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्वीटची चर्चा रंगली आहे.”माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!देव करो तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो”अशा आशयाचे इंग्रजी ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून ट्वीट केले आहे.सदरील ट्विट मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि सर्वात विश्वासू मानले जातात.काही काळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नार्वेकरांनी गट बदलला का?अशा चर्चा उडाल्या होत्या.मात्र यथावकाश ठाकरे आणि नार्वेकर या दोघांनीही त्या चर्चा धुडकावून लावल्याने धुरळा खाली बसला होता.उद्धव ठाकरे हे वारंवार भाजपवर तोफ डागताना दिसतात असे असतांना उद्धव ठाकरे यांचे ‘राईट हँड’ मिलिंद नार्वेकर मात्र ट्विटरवरुन अमित शहा यांना जाहीर शुभेच्छा देत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.तसेच नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला.विशेष म्हणजे एमसीएच्या अपेक्स काऊन्सिलच्या ९ जागांसाठी नार्वेकरांसह २३ जण रिंगणात होते.उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे एमसीएचे सदस्य असूनही तिघांनीही निवडणुकीत मतदान केले नाही.मात्र २२१ मतांसह नार्वेकर विजयी झाले.अपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत.