पाडळसे-पिळोदा शिवारात व्याघ्र दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !! वनविभागाकडून तात्काळ वाघ पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.११ जुलै २५ शुक्रवार
तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा शिवारात एका वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अचानक वाघ दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांनी आणि शेतकऱ्यांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना त्यांना पाडळसे आणि पिळोदा गावांच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात वाघ फिरतांना दिसला.सदरील वाघाला पाहताच शेतात एकच घबराट उडाली.वाघाने काही वेळ परिसरात वावर केल्यानंतर तो पुन्हा दाट झाडीत अदृश्य झाला तसेच त्या ठिकाणी वाघाने एका गाईला ठार मारल्याचे आढळून आले आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.विशेषतः शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन वाघाचा शोध घ्यावा आणि त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वनविभागाला दिली असून वनविभागाचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.वाघाच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पुढील काही दिवस नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अनावश्यक रात्रीचा प्रवास टाळावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.