प्रदीप सोनार,पोलीस नायक
मुंबई विभागीय (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २५ सोमवार
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला असून मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ दोषींची निर्दोष सुटका केली आहे.यापैकी एकाचा या कालावधीत मृत्यू झाला आहे तर ११ जणांची मुक्तता होणार आहे.माटुंगा रोड,माहीम जंक्शन,वांद्रे,सांताक्रूझ,जोगेश्वरी,बोरिवली आणि भाईंदर या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते.
सुमारे १९ वर्षांपूर्वी म्हणजेच ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सात ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आणि सात दोषींच्या जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधातील अपिलांवर बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिला.न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून निकालाचे वाचन करण्यात आले.दोषींना अमरावती,नागपूर आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते.मुंबईत ११ जुलै २००६ मध्ये ट्रेनमध्ये ७ साखळी बॉम्बस्फोट झाले होते व या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.संध्याकाळी ६.२४ ते ६.४२ वाजता दरम्यान हे बॉम्बस्फोट झाले त्यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये गर्दी होती. गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेवरील वेगवेगळ्या लोकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचे एकामागोमाग स्फोट झाले होते त्यामुळे १८९ जणांचे प्राण गेले तर कित्येक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले.या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये १२ जणांना दोषी ठरवून त्यांच्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली त्यानंतर गुन्हेगारांनी शिक्षेविरोधात अपिले केली तर राज्य सरकारने शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी याचिका केली मात्र वेगवेगळ्या कारणांनी अंतिम सुनावणीच सुरू होऊ शकली नव्हती.