सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
यावल तालुक्यातील पाडळसे येथील श्री महाकालेश्वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य कावड यात्रा आज सोमवार २८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर आयोजित या यात्रेत परिसरातील हजारो भाविकांनी सहभाग घेतला.
दरम्यान आज सकाळी लवकरच कावडधारक तापी नदीच्या पवित्र घाटांवर पोहोचले व तेथून जल कलशांमध्ये भरून ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात पाडळसे गावाकडे पायी निघाले.वाटेत ओम साई पेट्रोल पंपचे संचालक श्री रतन धोंडूशेठ भोई,विजय भोई व अजय भोई यांनी कावडधारकांसाठी पाणी,चहा आणि उपवास फराळाची व्यवस्था केली होती ज्यामुळे यात्रेकरूंचा उत्साह वाढला.यात्रेदरम्यान संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.कावडधारक पाडळसे येथील महाकालेश्वर मंदिरात पोहोचले व तेथे त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने भगवान महाकालेश्वरावर जलाभिषेक केला.या अभिषेकासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.श्री महाकालेश्वर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी या कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.यात्रेच्या यशस्वीतेमुळे पाडळसे गावाच्या धार्मिक परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली आणि भाविकांनाही एक अनमोल आध्यात्मिक अनुभव मिळाला.