जामनेरमध्ये सलग दोन गंभीर घटना तरीही मंत्री गिरीश महाजन गप्प का ? भीम आर्मी भारत एकता मिशनचा सवाल !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार
राज्यातील राजकारण करत असतांना ‘राज्याचे संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे मा.नामदार गिरीश महाजन हे स्वतःच्या जामनेर मतदारसंघातच अपयशी ठरत असल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनने केला आहे.
दरम्यान ११ ऑगस्ट २५ रोजी जामनेर तालुक्यात सुलेमान खान या तरुणाची अमानुष हत्या झाली.या घटनेला अवघे पाच दिवस उलटत नाहीत तोवर आज दि.१५ ऑगस्ट रोजी शेंदुर्णी येथे काही समाजकंटकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनीच विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना केली.या सलग दोन गंभीर घटनांवर मंत्री गिरीश महाजन मौन बाळगत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करत यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत ? व या घटना जाणूनबुजून घडवल्या जात आहेत का ? असा थेट सवाल भीम आर्मी जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाध्यक्ष सपकाळे म्हणाले,”एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना अशा पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना हा आंबेडकरी समाज कदापिही सहन करणार नाही.प्रशासनाने तातडीने आरोपी आणि त्यामागील मास्टरमाइंडना अटक करावी अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे आणि जामनेर तालुका प्रमुख प्रबुद्ध खरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.