Just another WordPress site

दिवाळी का साजरी करतात ? व दिवाळीचे पाच दिवसाचे महत्व

मीनाक्षी पांडव 

मुंबई विभागीय प्रमुख

दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे.अगदी बालगोपालांपासून ते वडीलधाऱ्या मंडळींपर्यंत सर्व मंडळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.पावसाळा संपून नवीन पिके हाताशी आलेली असतात.धनधान्याने कोठारे भरण्याची चाहूल शेतकऱ्यांना लागलेली असते.शरद पौर्णिमेच्या चांदण्यात कोजागिरी साजरी झालेली असते.गुलाबी थंडीची चाहूल हळूहळू लागण्यास सुरुवात होते.अशा या पार्श्वभूमीवर दिवाळीचे आगमन होते.अश्विन महिना संपता संपता दिवाळी सुरू होते आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीजेनंतर संपते. ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो.

दिवाळी का साजरी करतात

लखलखत्या प्रकाशाने,उजळल्या वाटा दिवाळी घेऊन आली,आनंदाच्या लाटा

दिवाळी का साजरी करतात:-

दिवाळी हा प्राचीन सण आहे.दिवाळी साजरी करण्याबाबत वेगवेगळे संदर्भ दिले जातात.आर्य लोकांचे उत्तर ध्रुवावर वास्तव्य असताना या सणाची सुरूवात झाली असा समज आहे.सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच तेथील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्याचे वाटत असावे आणि त्याप्रीत्यर्थ हा सण साजरा करत असावेत.काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून, रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र सीतेसह जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढून,दिव्यांची रोषणाई करून अयोध्या वासियांनी आपला आनंद व्यक्त केला.दिवाळी हा सण यक्षलोक देखील साजरा करीत.दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे.त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमीच दीप प्रज्वलन करून होते.रांगोळी ही शुभसूचक आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत,शुभप्रसंगी रांगोळी ही आवर्जून काढली जाते.दीपोत्सव हा घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून,पणत्या व आकाशदिवे लावून,आंब्याची पाने व झेंडूची फुले यांची तोरणे बांधून साजरा केला जातो.दिवाळीची सुट्टी असल्याने बालगोपालांची चंगळ असते.मुले मातीचा किल्ला तयार करून त्यावर मातीची खेळणी ठेवतात.धान्य पेरतात काही दिवसांनी अंकुर फुटले की किल्ला हिरवागार दिसू लागतो.दिवाळीपूर्वी घराची साफसफाई केली जाते.फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते.बाजारपेठा विविध प्रकारच्या वस्तूंनी सजलेल्या असतात.नवीन कपडे,दागिने वगैरेंची खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडालेली असते.वातावरणात एक प्रकारचे चैतन्य असते.दिवाळीसाठी जय्यत तयारी चालू असते.

दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व

दिवाळीचा सण अनेक ऐतिहासिक तसेच पौराणिक कथांशी निगडीत आहे.

देवी लक्ष्मीचा जन्म

पुराणानुसार,देवी लक्ष्मीचा जन्म कार्तिक महिन्यात अमावस्येला झाला.अनेक हिंदूबहुल भागात हा दिवस विविध विधी करून देवी लक्ष्मीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.संध्याकाळच्या वेळी लोक तिची पूजा करतात. तिला ‘संपत्तीची देवी’ म्हणूनही मानले जाते,म्हणून हिंदू तिच्याबद्दल खूप आदर करतात.

भगवान राम अयोध्येला परतले 

दिवाळी साजरी करण्याबाबत ही सर्वात जास्त स्वीकारलेली पौराणिक कथा आहे.रामायणानुसार १४ वर्षे वनवासात घालवल्यानंतर भगवान राम माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येच्या आपल्या राज्यात परतले.या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सुंदर दिव्यांनी आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजली होती लोकांनी आपापसात मिठाईही वाटली हा विधी आजही काटेकोरपणे पाळला जातो.

दिवाळीचे पाच दिवसाचे महत्व

  1. वसुबारस
  2. धनत्रयोदशी
  3. नरकचतुर्दशी
  4. लक्ष्मीपूजन
  5. बलिप्रतिपदा
  6. भाऊबीज
वसुबारस
अश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळीला सुरूवात होते.या दिवसाला वसुबारस असे म्हणतात.‘वसु’ म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य.त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.या दिवसाला गोवत्सबारस असेही म्हणतात. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गाईचे वासरू.आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.वेगवेळ्या ऋतूत वेगवेगळे सण साजरे करायची आपली मोठी परंपरा आहे.या दिवशी सायंकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा करण्याची प्रथा आहे.देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी असावी आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे यासाठी वासरासह धेनूपूजा केली जाते.गाईला आपण गोमाता म्हणतो गाईचे दूध म्हणजे पूर्णान्न आहे.गोमूत्र,गाईचे शेण यांचा वापर व उपयोग अनेक ठिकाणी केला जातो या जीवनदायी गोमातेबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गाईच्या पायांवर पाणी घालून,तिला हळदी,कुंकू,फुले, अक्षदा वाहून,गळ्यात फुलांची माळ घालून मनोभावे पूजा केली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य गाईला अर्पण केला जातो.घरासमोर सुरेख रांगोळी घालून,पणत्या लावून,आकाशकंदील लावून,विद्युत रोषणाई करून दीपपर्वास आरंभ होतो.
धनत्रयोदशी

अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात.या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा या राजाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यू पावणार असतो.आपल्या मुलाने सर्व सुख उपभोगावित म्हणून राजा आणि राणी राजपुत्राचे लग्न लावून देतात. लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यू होणार असतो.या रात्री राजपुत्राची बायको त्याला जागृत ठेवते.त्यांच्या अवतीभवती सगळीकडे सोन्याचांदीच्या  मोहरा ठेवल्या जातात.महालाचे प्रवेशद्वार सोने व चांदी यांनी भरून रोखले जाते.महालात सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. गाणी, गप्पा-गोष्टी करून पत्नी राजपुत्राला जागे ठेवते.जेव्हा यम सर्परूपाने राजपुत्राच्या महालात प्रवेश करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्याचांदीच्या लखलखाटाने दिपून जातात या कारणामुळे तो यमलोकात परत जातो.परिणामी राजकुमाराचे प्राण वाचतात.अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे यादिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा एक दिवा तेलवात करून लावला जातो.घरात कोणाचा अपमृत्यू होऊ नये यासाठी प्रार्थना केली जाते.दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा आहे असे दीपदान केल्याने अकाली मृत्यू टळतो अशी धारणा आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे.देवांनी जेव्हा दैत्यांसोबत समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली आणि धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले त्यामुळे यादिवशी लक्ष्मी आणि धन्वंतरी यांचेही मनोभावे पूजन केले जाते.धन्वंतरी हा वैद्यराज आहे त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो.आयुर्वेदिक चिकित्सक धन्वंतरीचे ( देवांचा वैद्य ) मनोभावे पूजन करतात. प्रसाद म्हणून कडुनिंबाची बारीक केलेली पाने साखरेसह देतात.कडुनिंबाच्या पानांचे ग्रहण केल्याने सर्व व्याधी नाहीशा होतात त्यामुळे या पानांचे सेवन नेहमी करावे.धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने दीर्घायुष्य आणि आरोग्य यांचा लाभ होतो. अशारीतीने दिवे लावून, धनपूजन व धन्वंतरी पूजन करून धनत्रयोदशी परंपरा कायम राखून साजरी केली जाते.

नरक चतुर्दशी

नरकचतुर्दशी यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या जुलमी राजवटीतून सर्वांना मुक्त केले.नरकासुराने आपल्या तपाचरणाने ब्रम्हदेवाने प्रसन्न करून घेतले होते.ब्रम्हदेवाकडून नरकासुरास अवध्याचे म्हणजे कोणाकडूनही वध होणार नाही असे वरदान मिळाले होते. त्यामुळे नरकासुर अतिशय उन्मत्त झाला होता त्याने या वरदानाच्या जोरावर अनेक राजांना पराभूत करून त्यांच्या कन्यांचे,राज्यातील स्त्रियांचे अपहरण करून त्यांना बंदी बनवले होते.नरकासुराने १६,१००  स्त्रियांना पळवून आणून,मणी पर्वतावर नगर वसवून तिथे या सर्व स्त्रियांना डांबून ठेवले होते.त्याने अवैध मार्गाने अगणित संपत्ती गोळा केली होती.सर्व देवदेवतांना,गंधर्व,मानव यांनाही नरकासुर अतिशय तापदायक झाला होता त्याची राजधानी प्राग्जोतिषपूर नगरी वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी,अग्नी,पाणी यांनी वेढलेली होती या अजिंक्य राजधानीवर कृष्णाने सत्यभामेसोबत गरूडावर स्वार होऊन चाल केली.कृष्णाने सत्यभामेच्या सहाय्याने नरकासुराचा वध केला.सर्वांना नरकासुराच्या अन्यायातून आणि जुलूमातून मुक्त केले.कृष्णाने नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या सर्व स्त्रियांना मुक्त करून त्यांच्याशी विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.यादिवशी अभ्यंग स्नानाचे महत्व आहे. सूर्योदयापूर्वी उठून, तेल उटणे लावून केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान.असे अभ्यंग स्नान करून कुटुंबातील सर्वजण फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेतात दिवाळीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण केली जाते.

लक्ष्मीपूजन

अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय.या दिवशी प्रदोषकाळी (सायंकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी,स्थिर लग्नावर,संध्याकाळी शुभ मुहूर्तावर,लक्ष्मीपूजन केले जाते.पाटावर रांगोळी घालून त्यावर तांदूळ ठेवतात.त्यावर एक तबक ठेवून त्यात दागिने,नाणी व नोटा ठेवतात श्रद्धापूर्वक लक्ष्मीपूजन केले जाते. घराघरांमधून दिव्यांची रोषणाई केली जाते.लक्ष्मीला साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे.नवीन केरसुणीची (झाडू) हळदी, कुंकू,फुलेवाहून पूजा जाते.व्यापाऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो.प्राचीन काळी या दिवशी रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती.कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो पुढे कुबेरासोबत लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली.कालांतराने गणपतीला कुबेराच्या जागी प्रतिष्ठित केले गेले.सचोटीच्या मार्गाने धन मिळविणे आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे या दोन्ही मूल्यांची जोपासना लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने केली जाते.

बलिप्रतिपदा

अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( बलीप्रतिपदा ) हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य,सुवासिनींकडून पतीला औक्षण,व्यापाऱ्यांकडून नवीन वर्षाचा प्रारंभ या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्व अधोरेखित होते.आपला देश हा कृषीप्रधान देश आहे.आपल्याकडील सणवार हे प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहेत.या दिवसाचे पौराणिक महत्व,मान्यता आणि परंपरा आपण थोडक्यात समजवून घेऊ.

पौराणिक कथेनुसार पार्वतीने याच दिवशी महादेवांना द्युतात हरविले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा म्हटले जाते.राक्षसांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता.राक्षस कुळात जन्माला येऊन सुद्धा तो अतिशय चारित्र्यसंपन्न,विनयशील व प्रजाहितदक्ष होता.दानशूर म्हणूनही त्याची ख्याती होती.आपल्या वाढत्या शक्तीच्या जोरावर त्याने देवांनासुद्धा पराजित केले होते.बळीराजाने एक यज्ञ केला होता या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती.भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून ते बटूच्या वेशात बळीराजा समोर उभे राहिले आणि त्यांनी तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दर्शवली.तेव्हा वामनावतारात असलेल्या विष्णूंनी महाकाय रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी पहिल्या दोन पावलात व्यापले.पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने आपण दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले.तेव्हा वामनाने बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले आणि पाताळलोकीचे राज्य बहाल केले.यासोबत वामनावतारातील विष्णूंनी वरदानही दिले की कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची,क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.व्यापाऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मुहूर्तावर वहीपूजन या दिवशी केले जाते.जमाखर्चाच्या नवीन वह्या यादिवशी सुरू केल्या जातात.या वह्यांची गंध,हळद कुंकू, फुले व अक्षदा वाहून मनोभावे पूजा केली जाते.उत्तर भारतातील लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात.प्राचीन काळी यादिवशी इंद्रदेवाची पूजा करण्याची प्रथा होती नंतर त्याचे गोवर्धन पूजेत रूपांतर झाले.श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करून विविध प्रकारची खाद्यान्ने आणि पक्वान्ने यांचा नैवेद्य अर्पण केला जातो याला अन्नकूट म्हणतात.दिवाळीच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी घालून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते.पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो.नवविवाहित जोडीची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते.याला दिवाळसण म्हणतात.जावयाला आहेर यादिवशी केला जातो.दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते याला दिवाळसण म्हणतात.जावयाला आहेर यादिवशी केला जातो.

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.यादिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून यमद्वितिया या नावानेपण हा सण साजरा केला जातो.बीज म्हणजे द्वितीया तिथी.बीजेच्या चंद्रकोरीप्रमाणे बंधुभगिनीमधील प्रेमाचे सदैव वर्धन व्हावे ही त्यामागील भूमिका आहे.यादिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करून घेतो.बहीण आपल्या भावाचे स्वागत गोडाधोडाच्या पदार्थांनी करते.भाऊ बहीणीला ओवाळणी देतो.भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण प्रत्येक समाजात असतो.आपल्याकडे भाऊबीजेला महत्व आहे.उत्तरभारतात राखीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आता वेगवेगळ्या प्रांतातील लोक कामकजानिमित्त भारतभर विखुरल्यामुळे राखीपौर्णिमा,भाऊबीज सर्वत्र साजरी केली जाते.

अशाप्रकारे दिपावलीचे सहा दिवसांचे पर्व सर्वत्र मोठ्या प्रमाणात,उत्साहात व झगमगाटात साजरे केले जाते.

पर्यावरणपूरक दिवाळी, गरज काळाची

बालमित्रमैत्रिणींनो,दिवाळी हा सण तुम्हा सर्वांचा आवडता सण आहे.याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही.एकतर सहामाही परीक्षा झाल्यानंतर या सणाचे आगमन होते.त्यामुळे डोक्यावर अभ्यासाचा बोजा अजिबात नसतो.पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते. वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता असते.विविध प्रकारच्या वस्तूंनी, खाद्यपदार्थांनी आणि कपड्यांनी बाजारपेठा गजबजलेल्या असतात. दिवाळीत काय काय करायचे,मुख्य म्हणजे कुठले फटाके आणायचे याची योजना तुम्ही अगोदरच आखलेली असते.

बालमित्रांनो,फटाके उडवताना मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके उडवा.फटाके हे ज्वालाग्राही रसायने वापरून तयार केलेले असतात.तसेच विषारीही असतात.त्यामुळे फटाके फोडल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे.फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण,इत्यादी होते. श्वसनाचे वेगवेगळे विकार फटाक्यांच्या विषारी धुरामुळे होऊ शकतात.विषारी धूर डोळ्यात गेल्याने नेत्रविकारही होऊ शकतात.त्यामुळे आतषबाजी करताना पर्यावरणाचे भान जरूर ठेवावे.कानठळ्या बसविणारे फटाके फोडले नाहीत तर जास्त चांगले.कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने वृद्ध माणसे,लहान मुले,पशुपक्षी सर्वांनाच त्रास होतो.पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी फटाक्यांविना प्रदूषण मुक्त दिवाळी ही संकल्पना हळूहळू रूजली पाहिजे.

फटाके तयार करायच्या कारखान्यात हे फटाके लहान मुलांना कामाला लावून बनविले जातात.बालकामगारांकडून काम करवून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.अनेकदा हे नियम पायदळी तुडविले जातात.फटाक्यांच्या कारखान्यात अनेकदा स्फोट होऊन आग लागते.कित्येकदा ही मुले मृत्युमुखी पडतात किंवा जायबंदी होतात.दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो.परंतु या घटनांमुळे या मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबात दुःखरूपी अंधार निर्माण होतो या सर्व गोष्टींचा विचार करून, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली पाहिजे.या दीपोत्सवामुळे सर्वांच्या जीवनात आनंद आणि सौख्यरूपी प्रकाश पसरावा ही सदिच्छा व्यक्त करते.

आमचे असंख्य वाचक,जाहिरातदार व हितचिंतक या सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.-पोलीस नायक न्यु पेपर परिवार-महाराष्ट्र राज्य

शुभेच्छुक:-श्री.बाळासाहेब आढाळे

  मुख्य संपादक,पोलीस नायक 

Leave A Reply

Your email address will not be published.