यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी उद्भवतात किंवा विद्यार्थिनी सोबत गैरप्रकार व अत्याचाराबाबत उपाययोजनावर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे सह अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार गठीत करण्यात आलेली आहे.सदर सल्लागार समिती प्रमुख मा.आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव,मा.श्रीमती एस आर भांगडिया-झवर जिल्हा सत्र न्यायाधीश जळगाव यांचे उपस्थितीत शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीग्रह जळगाव येथे आकस्मिक भेट देण्यात आली.
सदरील भेटीदरम्यान वस्तीगृहातील विद्यार्थिनी सोबत चर्चा करून त्यांच्या समस्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या भौतिक सोयीसुविधा त्यांची पाहणी करण्यात आली व त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या.त्याच दृष्टिकोनातून विद्यार्थिनींना मूल्यशिक्षण स्वयंरोजगार सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपाययोजना तसेच मुलींचे आरोग्य वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता इमारतीमधील स्वच्छता इत्यादी बाबत पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या अपरोक्ष विद्यार्थिनी सोबत छेडछाड किंवा गैरवर्तनुकीबाबत चर्चा करण्यात आली.या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे,त्यांचे मनोबल वाढविणे आणि स्वतःचे प्रश्न स्वतः सोडविणे,आत्मविश्वास निर्माण करणे,पुढाकार घेणे याबाबत प्रेरणा देणे व त्यांची सुरक्षितता हा होता.सदर भेटी दरम्यान माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेले मार्गदर्शन त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.यात स्वतःचे काम स्वतः करण्याची प्रेरणा,रोजच्या लहानमोठ्या कामात initiative घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले.आत्मविश्वास व स्वावलंबन,आव्हानांना सामोरे जाताना स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज पटवून दिली.प्रयत्नाशिवाय यश अशक्य,फक्त बोलून किंवा योजना आखून उपयोग होत नाही,ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.अभ्यास व वेळ व्यवस्थापन-नियमित अभ्यास,योग्य नियोजन आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.संवाद व सहकार्य कौशल्ये-मित्र,शिक्षक आणि वसतीगृह व्यवस्थापन यांच्याशी खुल्या संवादाचे महत्त्व पटवून दिले.भविष्यासाठी दिशा-करिअर नियोजन,स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासाबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.सदर भेटीदरम्यान जिल्हा सल्लागार समितीमधील इतर सदस्य अरुण पवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल,हेमंत भदाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालविकास जिल्हा परिषद,श्रीमती मीनाक्षी सुलताने शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती मंगला चौधरी,श्रीमती मीनाक्षी कोळी महिला बाल संरक्षण अधिकारी श्रीमती अलका दाभाडे गृहपाल श्रीमती वंदना वळवी मुख्याध्यापिका यांची प्रमुख उपस्थिती होती.