यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार
येथील यावल कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांना रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे यांच्या सुचना व मार्गदर्शनातून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहीती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की,यावल येथील कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात विविध विकास कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असल्याने व तशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी असल्याने रावेर यावल तालुक्याचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीच्या संचालक मंडळ सभेत विविध विकास कामांसाठी ठराव पारित करून प्रस्ताव शासनाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते.सदरील प्रस्तावांस शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे बाजार समिती सभापती राकेश फेगडे यांनी सांगितले आहे.सदर विकास कामांमध्ये मुख्यतः यावल मुख्य बाजार यार्डात तोल काटा साईडचे सपाटीकरण करून गटारीद्वारे सांडपाण्याचा निचरा करणे,पाण्याची टाकी व पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची सुविधा,५ हजार स्क्वेअर फुटाचे लिलाव ओटे इत्यादी तर उपबाजार किनगाव येथे पिण्याच्या व वापराच्या पाण्याची टाकी बांधकाम इत्यादी कामांचा समावेश आहे.सदरील सर्व कामे बाजार समिती स्वनिधीतून करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करणार असल्याची माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली.