जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून भडगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम काल दि.२४ सप्टेंबर २५ बुधवार रोजी नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.लोककल्याण मेळावा दि.१७ सप्टेंबर २५ ते २ ऑक्टोबर २५ या कालावधीत नगरपरिषदेच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून नागरिक व पथ विक्रेत्यांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.प्रशिक्षण सत्रात भारतीय अन्न पदार्थ व मानांक प्राधिकरण (FSSAI) चे तज्ज्ञ रामेश्वर राजू यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना व्यवसाय करताना कोणत्या नियमांचे पालन करावे व शासनाकडून कोणती प्रमाणपत्रे मिळवावीत तसेच अन्नपदार्थ विक्री दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय संघटक राजेंद्र गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय अधिक शिस्तबद्ध व स्वच्छतेच्या दृष्टीने उभारण्यास अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.