मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता युतीच्या चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून उधाण आले आहे त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर हजेरी लावली त्यामुळे शिंदे गट-मनसे आणि भाजप यांच्यातील महायुतीची घोषणा ही केवळ औपचारिकता राहिलेय की काय?असेही बोलले जात आहे.मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा निर्णय कोण घेणार?हे स्पष्ट केले आहे.कोल्हापुर येथे पत्रकारांनी विचारलेल्या मनसेसोबत युती होणार का?या प्रश्नाला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,मनसेशी युती करण्याचा प्रस्ताव अजून आलेला नाही व तसा प्रस्ताव आल्यास महाराष्ट्र भाजपची १३ जणांची कोअर कमिटी निर्णय घेते आमची यासंदर्भात बैठक झालेली नाही त्यामुळे यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगून विषयावर पूर्ण विराम दिला.देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन,प्रवीण दरेकर यासारख्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा हा महायुतीची नांदी मानला गेला त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे मनसे आमदार राजू पाटील आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील दिलजमाई होताना दिसली.बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची युती आधीच असल्यामुळे मनसेला दोन्ही पक्षांसोबत जुळवून घ्यावे लागेल.आम्हा सर्वांची मने जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल असे सूचक वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केले होते तर याआधी एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी उपस्थिती लावली होती त्यानंतर दिवाळीत त्यांचे सुपुत्रही राज यांच्या घरी आले.दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी शिंदेंनी लेकाला कुठला निरोप घेऊन ‘राज’ दरबारी पाठवले याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे मनसे-शिंदे गट यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.