‘बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही’ असे म्हणणाऱ्या भाजपाचे तमिळनाडूमधील नेते के.अण्णामला यांच्यावर संजय राऊतांचे टिकाश्र !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० जानेवारी २६ शनिवार
महानगरपालिकेच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांना आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी मुद्दा गाजत आहे.मुंबईला वाचवायचे असेल तर शिवसेना,मनसेला पाठिंबा देण्याचे आवाहन ठाकरे बंधूंकडून केले जात आहे.तर भाजपाकडून महापौर आणि मुंबईबद्दल होत असलेल्या विधानांवरही शिवसेना,मनसेकडून टीका होत आहे.
दरम्यान मुंबईतील प्रभाक क्र.४७ येथे प्रचार करण्यासाठी भाजपाचे तमिळनाडूमधील नेते के.अण्णामला आले होते व यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी एका स्थानिक यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला असून संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली असता त्यांना अण्णामलाई यांच्या विधानाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला यावर ते म्हणाले,एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे आहे ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही.गर्जना चांगली असली तरी तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असे म्हणतात यावर त्यांनी उत्तर दिले पाहिजे. “मुंबई महाराष्ट्राची नाही हे भाजपाचे स्टार प्रचारक सांगत आहेत.अण्णामलाई असे बोलत असतील तर त्यांच्याविरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे.महाराष्ट्राच्या राजधानीविषयी ते असे कसे विधान करू शकतात ? १०६ हुतात्म्यांचा अवमान भाजपाच्या अण्णामलाईने केला असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे.कुठे आहे तुमचे स्वाभिमानी बाणा?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
भाजपाचे नेते के.अण्णामलाई प्रचारादरम्यान दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,“मुंबईच्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे.तुम्ही चेन्नई शहरात पाहिले तर तिथे डीएमकेची सत्ता आहे आणि केंद्र भाजपा,बंगळुरू आणि हैदराबादमध्येही खाली काँग्रेस आणि वर भाजपा आहे.मुंबई असे एकमेव शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे.” के.अण्णामलाई पुढे म्हणाले,“बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही.हे आंतरराष्ट्रीय शहर आहे.या शहराच्या मनपाचे बजेट ७५ हजार कोटी आहे.चेन्नई ८ हजार आणि बंगळुरूचे बजेट १९ हजार कोटी आहे त्यामुळे या शहराचे नियोजन करण्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे.”