मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता.मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्य निघाली यावाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.मी बच्चू कडू यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेत आहे.बच्चू कडू यांनीही माझ्याविषयी अपशब्द आणि न पटणारी भाषा वापरली होती तेदेखील त्यांची ही वक्तव्य माघारी घेतील असे सांगत अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली तलवार म्यान केली आहे.रवी राणा हे काल दि.३० रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते त्यावेळी साडेतीन तास चर्चा झाली होती.यानंतर आज सकाळी रवी राणा पुन्हा एकदा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले याठिकाणी काही काळ चर्चा झाल्यानंतर रवी राणा हे सागर बंगल्यातून बाहेर पडेल.यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादाला मूठमाती देत असल्याची घोषणा केली आहे.
मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली साडेतीन तास ही बैठक सुरु होती काही मतभेद होते काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावरही चर्चा झाली.बच्चू कडू माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत.शिवसेनेतील आमदार आणि बच्चू कडू माझे सहकारी आहेत त्यामुळे वाद सुरु असताना तोंडातून काही वाक्य निघाले असेल तर मी ते वक्तव्य मागे घेतो.आम्ही दोघे सरकारसोबत आहोत आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे त्यामुळे मी हा विषय इथेच संपवत आहे.माझ्या शब्दाबद्दल कोणाला काही आक्षेप असेल कुणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे मी गुवाहाटीसंदर्भात केलेले माझे वक्तव्य मागे घेत आहे असे रवी राणा यांनी सांगितले आहे.
आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला.कडू यांनी म्हटले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली त्यामुळे त्यांचे आभार मानतो.आज अमरावतीला संध्याकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांची बैठक आहे त्यानंतर मंगळवारी उद्या मी भूमिका जाहीर करणार आहे.मी काही अयोग्य केले असे मला वाटत नाही.माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झाला होता त्यामुळे भूमिका घेणे महत्त्वाचे होते.उद्या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.