‘मातोश्रीवरील टीका करणे बंद करा तर मातोश्रीचे दरवाजे उघडतील’ !! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० जानेवारी २६ शनिवार
राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना कमालीचा वेग आल्याचे पाहायला मिळत असून सध्या महापालिका निवडणुकीच्या
प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.एवढेच नाही तर महायुतीमधील नेतेही एकमेकांच्या विरोधात टीका करतांना दिसत आहेत व असे असतांनाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलतांना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केल्याचे भाष्य केले होते त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साठी ’मातोश्री’चे दरवाजे बंद आहेत का? याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी सूचक भाष्य केले असून ‘मातोश्रीवरील टीका करणे बंद करा तर मातोश्रीचे दरवाजे उघडतील’ असे उद्धव ठाकरे यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल एका मुलाखतीत बोलतांना म्हणाले की,महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी जर मला चहा प्यायला बोलावले तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील मात्र उद्धव ठाकरेंनी ‘मातो श्री’चे दरवाजे माझ्यासाठी २०१९ मध्येच बंद केले आहेत असे फडणवीस यांनी म्हटल्याबाबतचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.या प्रश्नावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,“असे अजिबात झालेले नाही.एवढी माणुसकी विसरणारा मी नाही.मात्र तुम्ही मातोश्री बदनाम करण्यासाठी निघाला आहात.तुम्ही मातोश्रीवर वाट्टेल ते आरोप करता.ते तोंड तुम्ही बंद करा मग ‘मातोश्री’चे दरवाजे उघडतील” असे मोठे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.“‘मातोश्री’चे दरवाजे उघडतील हे मी एवढ्यासाठीच म्हणत आहे की त्यांनी बकवास करणे बंद करावे.मातोश्रीला बदनाम करण्याचे काम बंद करावे आमची कौटुंबिक बदनामी देखील बंद करावी कारण मी कधीही कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही.माझ्याकडे माहिती असून देखील मी कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही आणि कधी करणार देखील नाही” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.“मातोश्रीमध्ये येऊन अमित शाह यांनी जो शब्द दिला होता जो शब्द त्यांनी नंतर मोडला,त्या मातोश्रीबाबत आता तुम्ही बोलता? तेव्हा मी काय मागितले होते ? मला काही मागितले नव्हते,मी शिवसेनेसाठी मागितले होते कारण मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते मात्र तेच तुम्ही
नंतर गद्दारी करून घेतले मग त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री केले शेवटी काय मिळवले ? भाजपाने एक मित्र गमावला” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.