पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आता तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवणे पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.पोलिस ठाण्यात नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याने पोलिस दलाविषयी नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण होतात याची गंभीर दखल घेऊन महासंचालक कार्यालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे यात सर्व पोलीस स्टेशन प्रमुखांना नागरिकांची तत्काळ दखल व समाधान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जातात तेव्हा प्रभारी अधिकारी गस्त किंवा इतर सरकारी कामासाठी बाहेर असतात त्यामुळे ठाणे अंमलदार तक्रारदारांना प्रभारी अधिकारी येण्याची वाट पाहण्याचा सल्ला देतात यात तक्रारदार नागरिकांचा वेळ वाया जातो तसेच पोलिस आपल्याला सन्मानाची वागणूक देत नाहीत असा नागरिकांचा समजही होतो या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सर्व पोलीस स्टेशन प्रमुखांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याचे आदेश यात देण्यात आले आहेत.नागरिक पोलिस ठाण्यात लेखी,तोंडी तक्रार घेऊन येतात तेव्हा संबंधित प्रभारी अधिकारी पोलिस ठाण्यात उपस्थित नसल्यास त्यांच्यापेक्षा कनिष्ठ पोलिस अधिकारी किंवा ठाणे अंमलदार यांनी तक्रार स्वीकारावी व नागरिकांना तक्रार स्वीकारल्याची पोहोच द्यावी शक्य असल्यास वेळीच तक्रारींचे निरसन करावे असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महासंचालक कार्यालयाकडून पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांचे समाधान होईल याबाबत दक्षता घेण्यासाठी पोलीस स्टेशन प्रमुखांना सूचित करण्यात आले आहे.परिपत्रकातील काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत.‘तक्रारींच्या निराकरणाविषयी तपासणी व्हावी’,महिला किंवा ज्येष्ठ नागरिक तक्रार देण्यासाठी आल्यास प्राधान्याने त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी.याबाबत पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारींचा नियमित आढावा घ्यावा.नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण होत आहे की नाही याबाबत त्यांनी खात्री करावी.आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यांना अचानक भेटी देऊन तेथील नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत आहे की नाही याबाबत तपासणी करावी.
स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यास थेट व्हाट्सअप करा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.याबाबत सर्व पोलिस ठाण्यांत मोबाइल क्रमांकांचे फलकदेखील लावण्यात आले आहेत नुकतेच महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार प्रभारी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सूचित करण्यात आले आहे.नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.असे अंकुश शिंदे,पोलिस आयुक्त,पिंपरी-चिंचवड यांनी म्हटले आहे.