काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देताच भाजपा नेत्याच्या घरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची धाड !!
राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २६ शनिवार
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच सदर भाजपा नेत्याच्या घरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अचानक धाड टाकण्यात आली आहे.बासवाडा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.महेंद्रजीत सिंह मालवीय असे या भाजपा नेत्याचे नाव असून त्यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर मंगळवारी छापेमारी करण्यात आली आहे.२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महेंद्रजीत सिंह यांनी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले होते.मात्र रविवारी दि.११ जानेवारी २६ रोजी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिले. त्यासाठी मालवीय यांनी काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा व प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांची भेटही घेतली.मी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्या समर्थकांचीही हीच इच्छा आहे असे त्यांनी माध्यमांना सांगितले.दरम्यान मालवीय यांनी घरवापसीची घोषणा करताच दोन दिवसांत त्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून चौकशीचा ससेमीरा लावला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.राजस्थानमध्ये यापूर्वीही काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली होती त्यातील एका प्रकरणात माजी मंत्री यांना अटक करण्यात आली तर दुसऱ्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे स्वीय सहायक लोकेश शर्मा यांची दीर्घकाळ चौकशीही करण्यात आली होती.मात्र महेंद्रजीत सिंह मालवीय यांच्यावर झालेली ही कारवाई अत्यंत असामान्य मानली जात आहे व त्यामागचे कारण म्हणजे मालवीय यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिल्यानंतर दोन दिवसांतच ही कारवाई झाली आहे.महेंद्रजीत मालवीय यांनी अद्याप भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली नाही व त्यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा यासाठी भाजपाने दिलेला हा इशारा असल्याची चर्चा राजकीय
वर्तुळात सुरू आहे.काँग्रेसमधील नेत्यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणामागे काही तरी वेगळे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.मालवीय यांच्या घरावरील छापेमारी त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाला गती देण्यासाठीच करण्यात आली असावी अशी शंका काहींनी हीं उपस्थित करण्यात येत आहे.दरम्यान मालवीय यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेसच्या एका नेत्याने अशोक गेहलोत यांच्या प्रसिद्ध विधानाचा दाखला देत राजकारणात जे दिसते ते नसते आणि जे असते ते सहसा दिसत नाही असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान काँग्रेसचे विद्यमान आमदार असतानाही फेब्रुवारी २०२४ मध्ये मालवीय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती व भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.२०१८ मध्ये काँग्रेस सत्तेत असतांना मला मंत्रिपद दिले गेले नाही व यावेळीही विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव चर्चेत असूनही मला डावलण्यात आले.काँग्रेस आता काही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित राहिली आहे अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली होती.मालवीय हे राजस्थानच्या मेवाड-वागड या आदिवासी बहुल पट्ट्यातील लोकप्रिय नेते मानले जातात व त्यांच्या काँग्रेसमधील घरवापसीच्या चर्चेमुळे दक्षिण राजस्थानच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.महेंद्रजीत सिंह मालवीय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली.१९९८ मध्ये ते बासवाडा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.त्यानंतर २००८ पासून त्यांनी बागीदोरा विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला. याकाळात त्यांनी मंत्रिमंडळातील विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली.२०१३ मध्ये काँग्रेसला राजस्थानमध्ये मोठा फटका बसला होता त्यावेळी पक्षाच्या केवळ २१ जागाच निवडून आल्या होत्या व अशा बिकट परिस्थितीतही मालवीय यांनी आपला गड राखला होता.२०२० मध्ये काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते व त्यांच्या बंडानंतर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे मालवीय चर्चेत आले होते.त्या क्लिपमध्ये मालवीय आधी पायलट यांच्यासोबत होते आणि नंतर त्यांनी बाजू बदलल्याचा उल्लेख होता.मात्र गेल्या तीन दशकांपासून आपण अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगून मालवीय यांनी वादावर पडदा टाकला होता.
त्यानंतर २०२३ मध्ये काँग्रेसच्या कार्यसमितीवर त्यांची वर्णी लागली होती.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मालवीय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला.त्यावेळी भाजपाने त्यांना बासवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत त्यांचा दोन लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव झाला.इतकेच नाही तर त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बागीदोरा विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला होता.बागीदोरा मतदारसंघात भाजपाला गेल्या ४४ वर्षांपासून एकदाही विजय मिळवता आलेला नाही.दक्षिण राजस्थानमधील सात जिल्ह्यांत विधानसभेच्या एकूण ३५ जागा आहेत व त्यापैकी १६ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.सध्या या भागात भाजपाचे २३,काँग्रेसचे सहा तर इतर पक्षांचे चार आमदार आहेत.२०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला भीलवाडा, चित्तोडगड आणि राजसमंदमध्ये एकही जागा मिळाली नव्हती परंतु मालवीय यांच्या प्रभावामुळे बासवाडा जिल्ह्यातील पाच पैकी चार जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता.आदिवासी पट्ट्यातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी भाजपाने मालवीय यांना आपल्या गोटात घेतले होते.मात्र आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे भाजपाला या भागात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.