Just another WordPress site

यावल पंचायत समितीमध्ये आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक !! गटविकास अधिकारी गैरहजर तर अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट !!

यावल-पोलिसानी नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ फेब्रुवारी २६ शुक्रवार

येथील पंचायत समिती कार्यालयात यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आज अचानक भेट देत प्रशासनाची धडक तपासणी केली असता विविध विभागात धक्कादायक चित्र समोर असून या भेटी दरम्यान गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड कार्यालयात गैरहजर असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे त्यांच्या गैरहजेरीबाबत कोणताही रजेचा अर्ज उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले असून या प्रकारामुळे आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर आपण कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.याशिवाय पंचायत समितीमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर नसल्याचे दिसून आल्याने आमदार जावळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान “जनतेची कामे प्रलंबित ठेवून अधिकारी बेपत्ता राहणार असतील तर हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला असून स्थानिक नागरिकांकडून गटविकास अधिकारी नेहमीच कार्यालयात गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचेही आमदारांनी नमूद केले.प्रशासनातील ही बेजबाबदार कार्यपद्धती थेट ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला व बेशिस्त अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले.या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.अचानक झालेल्या या तपासणीमुळे पंचायत समितीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कार्यालयात अधिकारी नसतील तर सर्व सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषद प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावल पंचायत समिती बेशिस्तीचे व भ्रष्टाचाराचे माहेरघर बनले असुन शिस्त व प्रशासन नावाची कोणतीही वस्तु या ठीकाणी दिसुन येत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.