मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज्यात येऊ घातलेले ४ प्रकल्प ऐनवेळी राज्याबाहेर गेल्याने तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत आहेत.प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.पंतप्रधान हे देशाचे असतात एका राज्याचे नसतात अशी टीका करत आपल्याकडून गेलेले प्रकल्प गुजरातमध्येच कसे जातात?असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान हे सगळ्या राज्यांना समान न्याय देतात किंबहुना त्याचमुळे धारावीच्या प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्विकासाचे स्वप्न अनेकांनी दाखवले पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेल्वेची जागा देण्याचे पहिले उदाहरण राज्यात घडले.एअर इंडियाची बिल्डिंग बाहेर जाईल अशी परिस्थिती होती पण ती बिल्डिंग महाराष्ट्र सरकारला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्यासाठी केंद्र सरकारचे आम्हाला पाठबळ मिळाले. महाराष्ट्रातील विकास कामांची प्रगती त्याला लागणारा निधी त्यासाठीच्या परवानग्या… हे सगले पंतप्रधान कार्यालयातूनच होते असे सांगत पंतप्रधानांच्या कामाचा पाढाच शेलारांनी वाचला.राज ठाकरे यांना मी परिपक्व राजकारणी समजतो पण समोर आलेल्या टीजरवर उत्तर देणे मी परिपक्व राजकारण मानत नाही.गेल्या चार महिन्यांपासून आलेल्या आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रकल्पांविषयी मी त्यांना माहिती देईन मागील चार महिन्यात विविध प्रकल्प राज्यात आले आहेत.पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा झाली याबद्दल राज ठाकरेंनी अभिनंदन करायला हवे असेही शेलार म्हणाले.
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर तो गुजरातमध्ये गेला.पण पहिल्यापासून माझे मत एकच आहे.पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत प्रत्येक राज्य हे त्यांच्यासमान मुलांसारखे असले पाहिजे.उद्या समजा महाराष्ट्रातला हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि समजा तो आसामला गेला असता तर मला वाईट वाटले नसते असे राज ठाकरे म्हणाले.वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प महाराष्ट्रात येतोय आणि जो बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय…. म्हणूनच पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देण्याची गरज आहे.प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखे काय आहे असा सवालही राज यांनी उपस्थित केला.पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो संपूर्ण देशाबद्दल असला पाहिजे.प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योग धंदे आले पाहिजेत.तिथल्या लोकांना तिथून आपले घर सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची आणि तिकडच्या लोकांना त्यांचे ओझे बनण्याची आवश्यकता नाही असे प्रकल्प समजा प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल असेही राज ठाकरे म्हणाले.