यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ फेब्रुवारी २६ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील डोंगरदा रस्त्यालगत असलेल्या मोहाडी शिवारात काल रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास एका बिबट्या सदृश्य प्राण्याने येथील शेतकरी अरविंद सुरेश पाटील यांच्या मालकीच्या एका बोकड्यावर हल्ला चढवून त्याला ठार केले.प्रसंगी त्याठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांनी आरडाओरड केल्याने सदर बिबटया हा धूम ठोकून पळून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगितले जात आहे.सदर घटना गोविंदा बाळू बाऊस्कर(धनगर) यांच्या शेतात घडली असून यात सदरील बोकड हा गतप्राण झालेला आहे.
दरम्यान येथील शेतकरी अरविंद सुरेश पाटील यांनी सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना दिली व त्यानुसार घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस पाटील राजरत्न आढाळे याबाबतची माहिती स्वप्नील फटांगरे,वनपरीक्षेत्रपाल यावल पूर्व यांना दिली.सदरहू त्यांनी देखील कर्तव्यदक्षता दाखवत कालच दि.१८ फेब्रुवारी बुधवार रोजी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सोपस्कार आटोपून घेतले आहे.यात वनपाल आय.एस.तडवी यांनी सदर जागेवर जाऊन पंचनामा करून घेतला असून मृत्यू झालेल्या बोकडाच्या नुकसानीची पूर्तता करणेकामी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.दरम्यान सदर पंचनामा करणे कामी यावल वनपाल आय.एस.तडवी,वनरक्षक डोंगरे,पोलीस पाटील आर.आर.आढाळे,नुकसानग्रस्त शेळीपालक शेतकरी अरविंद पाटील व वन कर्मचारी उपस्थित होते.सदरहू परिसरात जातांना सावधानता बाळगावी, सतर्क रहावे,लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये,शेतात जातांना एकटे जाऊ नये,सोबत कोणी एक दोन जणांना घेऊन जावे म्हणजे ग्रुपने जावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान सदरील घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून वनविभागाने सदर बिबट्यास पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.