यावल नगरपालीकेत लेक लाडकी योजनेसह ८० विषय मंजूर !! मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी नगरपालिकेचा अभिनव उपक्रम !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ फेब्रुवारी २६ गुरुवार
येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल दि.१८ फेब्रुवारी बुधवार रोजी पार पडली असून या सभेत तब्बल ८१ विषय पटलावर होते व यातील लेक लाडकी हा विषय शहरातील मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे या संकल्पनेतून मंजूर करण्यात आला व मुलीस जन्म देणाऱ्या कुटुंबाला दोन हजार रुपयांचे अनुदान नगरपालिका देणार आहे. सदरहू सर्वानुमते हा विषय मंजूर झाला तर नमो गार्डन या विषयाला भाजपने विरोध नोंदवला असला तरी सत्ताधारी गटाने बहुमताने हा विषय मंजूर केला तर उर्वरित सर्व ८० विषय हे सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले आहे.यात क्रीडांगण,सीसीटीव्ही कॅमेरे व साने गुरुजी विद्यालयाचे प्रवेशद्वार बदलण्याच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली. सदरील नगर परिषदेची सर्वसाधारण सभा काल बुधवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
दरम्यान सभेच्या सुरूवातीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यु पश्चात त्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सभेच्या कामकाजाला मुख्याधिकारी निशिकांत गवई,सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे यांनी सुरुवात केली.यात लेक लाडकी या विषयावर चर्चा करण्यात आली. शहरात मागील वर्षात मुलींचा जन्मदर हा केवळ ७३ टक्के असल्याची माहिती प्रथम नागरिक नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी दिली व मुलीचा जन्मदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण लेक लाडकी ही योजना शहरात राबवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेसाठी कशा पद्धतीने निधीची उपलब्धता होईल याची देखील त्यांनी माहिती दिली व मुलीचा जन्म देणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहन पर दोन हजार रुपये अनुदान नगरपालिका देईल यावर शिक्कामोर्तब झाला आणि हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे शहरातील नगर परिषदच्या मालकीच्या क्रीडांगणासाठी आरक्षित जागा विकसित करणे या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली व सदर जागेकरीता सन २०१७ मध्ये नगरपालिकेने एक कोटी ४२ लाख रुपये हे या संबंधित मालकाला दिल्याची माहिती नगरसेवक अतुल पाटील यांनी सभागृहाला दिली व सदर क्रीडांगण विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून या विषयाला सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली.त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरातील अतिमहत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली.सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर ते संपूर्णपणे पोलीस प्रशासनाकडे वर्ग केले जातील व त्याची देखभाल दुरुस्ती साठीचा लागणारा संपूर्ण खर्च पोलीस प्रशासनाने करावा असे सुचित करण्यात आले आहे व हा विषय देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील विविध नागरी हिताच्या महत्त्वकांक्षी विषयांना मंजूर देण्यात आली आहेत.
या सभेमध्ये उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकूब काँग्रेसच्या गटनेता कमरुन्निसाबी सैफुद्दीन,भाजपाच्या गटनेता नंदा महाजन,शिवसेना उबाठा गटनेता सागर चौधरी, काँग्रेस गटनेता कमरुन्निसाबी सैफुद्दीन,राष्ट्रवादी (अप)च्या गटनेता वर्षा चोपडे सह विविध विषयावर नगरसेविका कल्पना वाणी,उमेश फेगडे,हेमराज हेगडे,पराग सराफ, योगेश चौधरी,रुबाब तडवी आदी नगरसेवकांनी आपली मते व्यक्त केली व ८१ पैकी ८० विषयांना मंजुरी देण्यात आली.
नमो गार्डनला भाजपचा विरोध ?
वैशिष्ट्यपूर्ण योजनेत गट क्रमांक ७१४ व १०३८ च्या खुल्या जागेत नमो उद्यान विकसित करण्याचा विषय पटलावर आला व याला भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला.सदर गार्डन हे गट क्रमांक ८२८ किंवा इतर लोकवस्तीतील भुखंडावर व्हावे असा त्यांचा आग्रह होता.पुरेसा निधी याकरिता नसल्याने गट बदलचा प्रस्ताव नाकारण्यात आला व संबंधित जागेवर नमो गार्डनच्या या विषयाला भाजपाच्या बारा सदस्यांनी विरोध नोंदवला तर सत्ताधारी गटातील १३ सदस्यांच्या मतदानाने बहुमताने हा विषय मंजूर करण्यात आला.