यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ फेब्रुवारी २६ रविवार
महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पाच्या संचालक मा.श्रीमती पुनम पाटे,यावल जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख,IISER Pune येथील शास्त्रज्ञ व्ही.एस.राव, Savitribai Phule Pune University येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद सरदेसाई तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे,आँचल सोनकुसरे,सौरभ वाळके व अन्य कर्मचाऱ्यांनी नुकतीच यावल वनविभागास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
सदर दौऱ्या दरम्यान मान्यवरांनी सर्वप्रथम यावल येथील मध्यवर्ती रोपवाटिकेस भेट दिली व येथे उपलब्ध असलेल्या विविध वृक्षप्रजाती,त्यांचा लागवड कालावधी,बीज संकलन प्रक्रिया,अंकुरण कालावधी,स्थानिक व दुर्मीळ प्रजातींची निवड,औषधी वनस्पती तसेच खोड-कलम पद्धतीने होणारी वाढ यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्थानिक गवतांच्या प्रजाती लागवडीसाठी योग्य स्थळांची पाहणीही यावेळी करण्यात आली.यानंतर पथकाने मोर धरण परिसराला भेट देत विविध वृक्ष प्रजाती,पक्ष्यांच्या जाती तसेच वन्य प्राण्यांचे निरीक्षण केले.मोर नदी परिसरातील गवतांच्या विविध प्रजाती,वनस्पती वैविध्य आणि प्राणीजीवन यांचा अभ्यास करत सातपुडा पर्वतरांगांतील समृद्ध जैवविविधतेचा एकत्रित आढावा घेण्यात आला.या भेटीमुळे यावल वनविभागाच्या संवर्धन,संशोधन व स्थानिक प्रजाती संवर्धन उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याची भावना वन निसर्ग प्रेमींमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.