सनी पटेल,बारामती
पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार
स्व.अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाला आज एक महिना पूर्ण झाला असून देखील बारामतीच्या मनातील जखम अजूनही ताजी आहे.वेळ पुढे सरकत असली तरी दादांची आठवण प्रत्येकाच्या हृदयात तितकीच जिवंत आहे.शहरातील प्रत्येक चौक,प्रत्येक रस्ता,प्रत्येक विकासकाम आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देताना दिसतो.गेल्या महिनाभरात बारामतीतील वातावरणावर शोककळा पसरलेली आहे.अनेकांच्या डोळ्यांत अजूनही अश्रू तरळताना दिसतात.“दादा असते तर…” हा शब्दप्रयोग आज प्रत्येकाच्या तोंडी आहे.त्यांच्या अचानक जाण्याने केवळ एक नेता नाही तर घरातील कर्ता माणूस हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.दादांची काम करण्याची शैली वेगळी होती.निर्णय घेताना ठामपणा,विकासाच्या कामात वेग आणि सर्वसामान्यांशी साधेपणाने संवाद या गुणांमुळे त्यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. एखाद्या छोट्या शेतकऱ्याचा प्रश्न असो किंवा मोठ्या प्रकल्पाचा निर्णय दादांनी नेहमी बारामतीचा विचार प्रथम केला.आज बारामतीत उभ्या असलेल्या अनेक संस्था,रस्ते,शैक्षणिक संकुले,उद्योग आणि पायाभूत सुविधा या सर्वांमध्ये त्यांचा दूरदृष्टीचा ठसा उमटलेला आहे म्हणूनच त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अधिकच जाणवते.
गेल्या महिनाभरात सोशल मीडियावर दादांचे भाषणांचे व्हिडिओ,फोटो आणि जुने क्षण पुन्हा पुन्हा पाहिले जात आहेत.अनेकांनी आपल्या स्टेटसवर त्यांचे छायाचित्र ठेवून श्रद्धांजली वाहिली.काहींनी त्यांच्या नावाने रक्तदान शिबिरे,वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबवले.गावागावांत साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरे करण्यात आले.यात्रा-जत्रा रद्द करून शांततेत प्रार्थना करण्यात आली.अनेक घरांत आजही त्यांच्या आठवणी काढताना डोळे पाणावतात.दादांच्या जाण्यानंतर सुरू असलेल्या काही विकासकामांबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न आहेत.“हा वेग कायम राहील का?”, “दादांसारखी धडाडी पुन्हा पाहायला मिळेल का?” अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत.मात्र त्यांच्याच शिकवणीवर चालत विकासाचा मार्ग पुढे नेण्याचा निर्धार बारामतीकर करताना दिसत आहेत.दादांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते ते बारामतीच्या ओळखीचा एक भाग होते.त्यांच्या आठवणी,त्यांचे कार्य आणि त्यांची कार्यतत्परता आजही प्रत्येकाच्या मनात प्रेरणा देत आहे.वेळ जाईल,दिवस बदलतील पण दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही अशी भावना बारामतीकरांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.