Just another WordPress site

बारामती पोलिसांच्या धडक कारवाईत २ कोटी ३५ लाखांचा अंमली पदार्थ जप्त !! ४७० किलो गांजा टाकून आरोपी फरार !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०१ मार्च २६ रविवार

बारामती विभागात राबविण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी,रात्रगस्त व वाहन तपासणी मोहिमेमुळे अंमली पदार्थ तस्करीचा मोठा कट उघडकीस आला असून तब्बल ४७० किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.पोलिसांच्या कडक कारवाईचा धाक बसल्याने आरोपींनी दोन मोठ्या ड्रममध्ये भरलेला गांजा शेतात टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली बारामती विभागात व्यापक मोहीम राबविण्यात आल.या मोहिमेत नाकाबंदी,रात्रगस्त,वाहनांची काटेकोर तपासणी,कागदपत्रांची पडताळणी आणि संशयित हालचालींवर सतत देखरेख ठेवण्यात येत होती.सदरहू गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी धोरणात्मक नियोजन करून विविध ठिकाणी पथके तैनात केली होती.याच पार्श्वभूमीवर मौजे जळोची,पिंपळी रोड परिसरातील शेताच्या मोकळ्या रानात दोन संशयास्पद ड्रम आढळून आले.पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात आरोपींनी ते ड्रम तेथेच टाकून पळ काढल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या ड्रममध्ये सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा एकूण ४७० किलो गांजा साठवलेला असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान प्राथमिक तपासानुसार येत्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने हा गांजा बारामती विभागात आणण्यात आला होता.सणासुदीच्या काळात तरुणांना लक्ष्य करून अवैध कमाई करण्याचा तस्करांचा डाव होता मात्र पोलिसांच्या सततच्या दबावामुळे आणि प्रभावी नाकाबंदीमुळे आरोपींची योजना फसली.ही कारवाई बारामती विभागातील अंमली पदार्थांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती मानली जात आहे.प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत धाडसी आणि तत्पर कारवाई करत हा मोठा साठा जप्त केला.पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून अनेक कुटुंबे व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापासून वाचली आहेत.या घटनेमुळे परिसरात पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.बारामती पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.सदर प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरहू नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन चिवडशेट्टी ,प्रभारी पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.