बारामतीत प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला !! तिघांना अटक
एलसी कंपनी लेक परिसरातील घटना !! ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती,जिल्हा (प्रतिनिधी)
दि.३ मार्च २६ मंगळवार
बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव, वय २६, मूळ नागपूर, सध्या बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. फिर्यादीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून जखमी केले.
यानंतर आरोपींनी सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) तसेच २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. “परत इकडे यायचं नाही” अशी धमकी देत आरोपी तेथून पसार झाले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी प्रसाद गणपत भोसले (वय २४), धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) व कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बन्ने व पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.