माळेगाव नगरपंचायत क्षेत्रात विकासाचे प्रश्न !! ढगाईनगर परिसरात कच्चे रस्ते व गटार लाईनचा अभाव !!
कच्च्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त !! काही भागात गटार लाईनच नाही !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०५ मार्च २६ गुरुवार
माळेगाव (ता.बारामती) नगरपंचायत स्थापन होऊन काही वर्षे उलटली असली तरी शहरातील काही भागांमध्ये अद्याप मूलभूत सुविधांची कमतरता जाणवत आहे.विशेषतः ढगाईनगर परिसरातील नागरिकांना कच्च्या रस्त्यांमुळे तसेच काही ठिकाणी गटार लाईन नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,या भागात काही ठिकाणी रस्ते बनविण्यात आले आहेत मात्र ते अद्याप कच्च्या स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.उन्हाळ्यात धुळीचे प्रमाण वाढते तर पावसाळ्यात चिखल व पाण्याचे खड्डे तयार होतात त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो.शाळकरी मुले,ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा अधिक त्रास होत असल्याचे नागरिक सांगतात.
याशिवाय परिसरातील काही रस्त्यांलगत गटार लाईन नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच वाहताना दिसते त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकत्र साचल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
ढगाईनगर परिसरात गेल्या काही वर्षांत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.नवीन घरे आणि इमारती उभ्या राहत आहेत मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा अद्याप पूर्णपणे विकसित झालेल्या दिसत नाहीत त्यामुळे नागरिकांकडून नगरपंचायतीने या भागातील रस्ते पक्के करणे तसेच ज्या ठिकाणी गटार लाईन नाही त्या ठिकाणी तातडीने गटार व्यवस्था उभारावी अशी मागणी केली जात आहे.
या वार्डचे नगरसेवक जयदीप तावरे असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांच्या माध्यमातूनही हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवला असल्याचे सांगितले जाते.नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रस्ते व गटार व्यवस्थेच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माळेगाव नगरपंचायतीने शहराच्या विकासासाठी विविध कामे हाती घेतली असली तरी ढगाईनगरसारख्या वाढत्या वस्तीच्या भागात मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.