सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१२ मार्च २६ गुरुवार
शहरात सध्या घरगुती गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून HP Gas सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने बारामती शहर व परिसरातील विविध गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.अनेक ठिकाणी पहाटेपासूनच नागरिक गॅस सिलिंडरसाठी एजन्सीसमोर जमा होत असून दिवस वाढत जातो तशी गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.गॅस मिळवण्या- साठी महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गही रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी तर शेकडो नागरिक रांगेत उभे असल्याने रांगा रस्त्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे त्या परिसरात वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.अनेक नागरिकांनी तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार,गॅसचे नियमित बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नाही.काहींना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असून काही ठिकाणी तर गॅस संपल्याचे सांगून नागरिकांना परत पाठवले जात असल्याचेही समोर आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.गॅस हा घरगुती स्वयंपाकासाठी अत्यंत आवश्यक असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी अडचणी येत आहेत.काही जणांना तात्पुरता उपाय म्हणून लाकूड,कोळसा किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हचा वापर करावा लागत असल्याचेही सांगितले जात आहे.दरम्यान गॅस एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा सध्या कमी प्रमाणात येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र लवकरच पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जात असले तरी नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅसचा नियमित आणि पुरेसा पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे.सध्या बारामती शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून लांबलचक रांगा,तासन्तास प्रतीक्षा आणि सिलिंडर मिळण्याबाबतची अनिश्चितता यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.