चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात दलित समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीला विरोध
मृतदेह ८ तास अंत्यसंस्काराविना पडून;तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कार
कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पुरोगामी विचारांच्या व छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत एक दुर्देवी घटना घडली आहे.दलित समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीला काही लोकांनी विरोध केला यामुळे चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात तब्बल ८ तास मृतदेह अंत्यसंस्कार विना ठेवावा लागला यामुळे या गावात शनिवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.काही ग्रामस्थांनी विरोध केल्याने येथील दलित नागरिकांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला होता.मात्र तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी समजूत काढल्यानंतर आठ तासानंतर रात्री उशिरा मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आला.अनंत प्रभू कांबळे (वय ३२ रा. हलकर्णी) यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले होते त्यानंतर नेहमीप्रमाणे गावच्या जवळील स्मशानभूमीत दफनविधी करण्यासाठी येथील दलित नागरिक खोदाई करण्यासाठी स्मशानभूमीत गेले.मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद निर्माण झाला हा वाद शिगेला गेल्याने दलित समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारत प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन सुरू केले.
जागेविषयी वाद असल्याने तुमच्या खासगी जागेत यावेळी अंत्यविधी करा आणि त्यानंतर यावर तोडगा काढू असे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितल्यावर दलित समाजातील नागरीक तयार झाले मात्र त्यातील काही नागरिकांनी नकार दिला.प्रत्येकवेळी प्रशासन असेच सांगते आणि वेळ मारून नेते त्यामुळे यावेळी याबाबत तोडगा काढल्याशिवाय अंत्यविधी होणार नाही म्हणत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.दरम्यान सरपंच राहूल गावडा,उपसरपंच रमेश सुतार,माजी सरपंच एकनाथ कांबळे,पोलीस पाटील अंकुश पाटील यांच्या पुढाकाराने दलित समाजातील नागरिकांची समजूत काढत स्वमालकीच्या जागेत अंत्यविधी करण्यात आला.