पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत.आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी सिल्लोड मधून देतो मग समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.मी आठ दिवसांत राजीनामा द्यायलाही तयार आहे असे सत्तार यांनी सांगितले ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाला सातत्याने डिवचणाऱ्या आणि अंगावर घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे.मी म्हटले होते की तुम्ही वरळीतून राजीनामा द्या आणि मी सिल्लोडमधून राजीनामा देतो मग त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केले तुम्हाला दोन वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते.मी म्हणले दोन वर्ष कशाला वाट बघायची आता टेस्ट मॅच होऊन जाऊ द्या आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.आताही माझे चॅलेंज आहे की त्यांनी नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की आठवडाभराच्या आत राजीनामा देईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसेच महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथे ‘हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन’या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना सत्तार बोलत होते.यावेळी अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांना राज्य सरकार दुप्पट नुकसान भरपाई देईल असे मला वाटते.महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे जुलै आणि ऑगस्टमध्ये नुकसान झाल्यास सप्टेंबरमध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते.ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . याकरता राज्य सरकार एस डी आर एफ च्या निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देत आहे. प्रसंगी हा निधी जर कमी पडल्यास केंद्र सरकार राज्य सरकारला आर्थिक मदत करेल,असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.हॉर्टिकल्चर मध्ये नवनवीन प्रयोग करण्याकरता कृषी विभाग शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहित करेल या देशातील कृषी क्षेत्र वाढविण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार नेहमीच प्रयत्नशील असेल असेही तोमर यांनी सांगितले.