मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
येत्या सहा महिन्यांत राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्रे उभारण्यात येतील असे कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.याकामी राज्यातील उद्योगांनीही सहकार्य करून त्यांच्या उद्योगाला आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी केंद्रे उभी करावीत यासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना सुरुवात होत असून लवकरच विद्यापीठाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले जाईल.२०२४पूर्वी नव्या इमारतीत विद्यापीठाचे कामकाज आणि अभ्यासक्रम सुरू होतील हे अभ्यासक्रम मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकविण्यात येतील.राज्यात येत्या वर्षभरात पाच लाख युवकांना रोजगार देण्यात येईल त्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.कौशल्य विद्यापीठ हे शहरकेंद्रीत न ठेवता ग्रामीण भागातही अभ्यासक्रमांना चालना देण्यात येईल असे लोढा यांनी नमूद केले आहे.
कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या भावी वाटचालीची माहिती दिली.विद्यापीठ मुंबईकेंद्रीत न ठेवता राज्यातील सहा भागांमध्ये त्याचा विस्तार करण्यात येईल त्याचबरोबर येत्या चार वर्षांत दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीसाठी कौशल्यविकासाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.त्यामुळे राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे सक्षमीकरण होऊन त्यांचा कौशल्यविकास होईल तसेच कुशल रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीच्या चळवळीला मोठी गती प्राप्त होईल.सर्वांच्या सहभागातून या विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी केले.या विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स,सायबर सिक्युरिटी,मशिन लर्निंग,बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन,बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन,न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमाचा समावेश आहे.