मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत मात्र या शेवटच्या तासांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व मतदारसंघात पडद्यामागून ‘नोटा’ला मत टाका यासाठी पद्धतशीरपणे प्रचार केला जात आहे.ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली होती.अंधेरी पोटनिवडणुकीत एका सर्वेक्षणाचा दाखल देऊन ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटाला जास्त मते पडतील असा प्रचार सुरु आहे.सोशल मीडिया आणि व्हाट्सअपवर फिरत असलेल्या या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ४१ हजार,नोटाला ४३ हजार आणि अपक्षांना सात हजाराच्या आसपास मते पडतील.यानंतर ठाकरे गटाने हा सर्व्हे बनावट असल्याचा खुलासा केला आहे.
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या संदर्भातील तक्रार निवडणूक आयोग आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.आरपीआय आठवले गट या भाजपच्या एनडीएमधील मित्रपक्षाचे कार्यकर्ते नोटाला मतदान करावे यासाठी पैसे वाटत असतानाचे व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे.ठाकरे गटाच्या या तक्रारीनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत.ऋतुजा लटके यांना विजयाचा आत्मविश्वास असेल तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रार का करत आहे?असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ९८-९९ टक्के मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.अंधेरी पूर्वमध्ये एकूण २,७१,००० मतदार आहेत.मतदारसंघात ३८ ठिकाणी २५६ केंद्रांवर मतदान होणार आहे.पोटनिवडणुकीसाठी अंधेरीतील नागरिकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.