वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
सदरील निर्णय अपमानित करणारा व अन्यायकारक
जळगाव – पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ‘आपले गुरुजी’मोहिमे अंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी शिक्षकांची जाहीर माफी मागावी अशा आशयाचे मागण्यांचे निवेदन काल दि.२९ रोजी श्री.विकास पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जळगाव यांना देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक भारती (प्राथमिक)जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी दिली आहे.
शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शाळांना शिक्षकांचे फोटो ए-४ साईज पेपरवर वर्गात लावण्याचे आदेश दिले आहेत.तसेच पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केले.या दोन्ही घटनांचा शिक्षक भारती संघटना निषेध करीत आहे.विद्यार्ध्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.शिक्षकांनी चांगल्या प्रकारे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे.९९.९९ टक्के शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहे.केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही.त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये.दि.२९ रोजी आपले गुरुजी फोटो लावणे व आ.प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल भारती शिक्षक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर शाळेत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.आपले शिक्षक मोहिमे अंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा व आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी शिक्षकांची जाहीर माफी मागावी या आशयाच्या मागणीचे निवेदन दि.२९ रोजी श्री.विकास पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जळगाव यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील.जिल्हाकार्याध्यक्ष अजयकुमार पाटील,जिल्हासंपर्क प्रमुख रवींद्र पाटील,सुनील गरुड,सुशील पाटील,धरणगाव तालुकाध्यक्ष सुनील बोरसे,जळगाव तालुकाध्यक्ष पंकज गरुड,संघटक पुनमचंद वंजारी,अकील शेख,भास्कर वानखेडे,खा.प्रा.अध्यक्ष अजित चौधरी,गोलू लोखंडे,सागर झांबरे,राहुल चौधरी,आसीन खान,समाधान सोनवणे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.या प्रसंगी शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.