पुणे :
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवले असता भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य करत काढता पाय घेतला होता.रुपाली बडवे या महिला पत्रकाराने भिडेंना थांबवले असता ते म्हणाले,’आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे व भारतमाता विधवा नाही आहे.कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’,असे वक्तव्य करत महिला पत्रकाराचा जाहीर अपमान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मात्र संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे.महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे असे आयोगाने म्हटले आहे.
आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे.तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडेंच्या या वक्तव्याचा निषेध करत संभाजी भिडेंचा समाचार घेतला आहे.’साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही,असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे.याआधी ही महिलांना हीन समजणारी,तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.