दिल्लीत पुन्हा एकदा शिवगर्जना घुमणार! लाल किल्ल्यावर ‘राजा शिवछत्रपती’या हिंदी महानाट्याचे प्रयोग होणार !!
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शिवगर्जना घुमणार आहे.दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर २ ते ६ नोव्हेंबर या कालावधील ‘राजा शिवछत्रपती’ या हिंदी महानाट्याचे प्रयोग होणार आहेत तब्बल चार वर्षांनंतर राजा शिवछत्रपती नाटकाचे सादरीकरण दिल्लीत होत आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रसिद्ध साहित्यकृती राजा शिवछत्रपतीवर आधारित हे नाटक आहे.या नाटकात काम करणारे २००हून अधिक कलाकार पुण्याहून दिल्लीला रवाना झाले आहेत.लाल किल्ल्याच्या मैदानात भगवे झेंडे फडकले आहेत तसेच आजूबाजूचा परिसरही उजळून निघाला आहे हे नाट्य तीन तासांचे असून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र या नाटकातून दिल्लीकरांना अनुभवायला मिळणार आहे.महानाट्याची सुरुवात अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमणापासून होईल तर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाने नाटकाची सांगता होणार आहे.नाटकासाठी आयोजकांनी किल्ले रायगडाचा चार मजली सेटही उभारला आहे.२०१८साली पहिल्यांदा या नाटकाचा प्रयोग राजधानी दिल्लीत पार पडला होता.संपूर्ण देशभरात आत्तापर्यंत या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत तर परदेशातही या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले आहे.
दिल्लीत होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगाची फी निशुल्क असणार आहे.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने हा शो आयोजित करण्यात आला आहे.दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असल्याने चर्चेला उधाण आले आहे.उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे माजी महापौर असलेले भाजपचे पदाधिकारी जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार या नाटकामुळे नागरिकांना आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा याबाबत माहिती मिळेल नागरिक या प्रयोगाला नक्कीच पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे.