बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
घरात नवी कार खरेदी केल्यानंतर ती कुटुंबातील इतर सदस्यांनाही चालवण्यास शिकवावी असा अनेकांचा प्रयत्न असतो मात्र असे करताना योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याचा मोठा धोका असतो असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे घडला असून भीषण अपघातात एक महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,देऊळगावाराजा येथील रामनगरमध्ये शिक्षक अमोल मुरकुटे हे आपली पत्नी स्वाती मुरकुटे यांना कार शिकवत होते.मुरकुटे दाम्पत्यासोबत त्यांची पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगी सिद्धी मुरकुटे ही देखील होती.दरम्यान पत्नीला कार शिकवत असताना चिखली रोडवर ताबा सुटल्याने कार थेट ७० फुट खोल विहिरीमध्ये कोसळली या अपघातानंतर अमोल मुरकुटे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले मात्र त्यांची पत्नी स्वाती मुरकुटे व मुलगी सिद्धी मुरकुटे यांचा मात्र पाण्यामध्येच मृत्यू झाला.जखमी अवस्थेतील अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुटे व सिद्धी मुरकुटे यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात येत असून अग्निशमन दलाची गाडी तसेच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.दरम्यान एकीकडे बुलढाणा जिल्ह्यात रस्ते अपघाताची मलिका सुरू असताना आता गाडी शिकवण्याच्या प्रयत्नात आपल्या पत्नी व मुलीला गमवायची वेळ एका शिक्षकावर ओढावली आहे.