मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीसह आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार,राज्यसभा खासदार यांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.विधान परिषद,राज्यसभेच्या सर्व आमदार,खासदारांच्या निधीचा खर्च आता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.राज्यात रोजगार मेळावे घेऊन आणि ७५ हजार जागांची भरतीची घोषणा करून शिंदे-फडणवीस सरकार विधानसभा निवडणुकीची तयारी करतेय का?असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला होता त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार की काय?अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषदेतील आमदार यांना मिळणारा निधी आता पक्षाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य नाही अशा मतदारसंघात हा निधी खर्च केला जाणार आहे हा निधी कसा आणि कुठे खर्च करायचा?याचा प्राधान्यक्रम पक्षाची तीन सदस्यीय समिती ठरवेल.त्यासाठी श्रीकांत भारतीय,खासदार डॉ.अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती निश्चित करण्यात आली आहे.दरम्यान शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावरही भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणुका पाहाता भाजपने वरळी मतदारसंघात फायरब्रॅण्ड नेते तेसस्वी सूर्या यांना बोलावले आहे.भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे वरळी मतदारसंघात तरुणांना आकर्षित करण्यासाठी येणार आहेत.ज्या जागेवर भाजपचे आमदार आणि खासदार गेल्या तीन टर्ममध्ये निवडून आलेले नाहीत किंवा निवडणूकच लढवली नाही अशा मतदारसंघात भाजपने कंबर कसायला सुरुवात केली आहे.आतापर्यंत भाजप हे ठाणे,रायगड,कोल्हापूर,धाराशिव,कल्याण यांसारख्या अनेक लोकसभा मतदारसंघात आपल्या मित्र पक्षाला मदत करत होते आता भाजपने मिशन ४५ सुरू केले आहे.त्यासाठी विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार हे आपला निधी या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहेत.