जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर आगपाखड करणाऱ्या शरद कोळी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.या सगळ्यामुळे जळगावातील राजकारण प्रचंड तापले असून येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून गुरुवारी शरद कोळी यांना जळगावमध्ये भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता.या भाषणबंदीनंतर पोलिसांकडून शरद कोळी यांना ताब्यात घेतले जाईल अशी चर्चा होती.सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेही होते मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत त्यामुळे शरद कोळी हे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
ठाकरे गटाकडून शरद कोळी यांच्यावर युवासेनेचे राज्य विस्तारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्यानंतर शरद कोळी अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे गटाची बाजू मांडत असून ते सातत्याने शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत.जळगाव जिल्ह्यातील महाप्रबोधन यात्रेत तर शरद कोळी यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अत्यंत घणाघाती भाषेत टीका केली होती.यावर शिंदे गटाने आक्षेप नोंदवत पोलिसांना निवेदन दिले होते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शरद कोळी यांना जळगावमध्ये भाषण करण्यास मज्जाव केला होता.विशेष म्हणजे पोलीस ही नोटीस घेऊन शरद कोळी यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलवर पोहोचले होते त्यावेळी पोलीस हे शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले आहेत असा कार्यकर्त्यांचा समज झाला त्यामुळे हॉटेलच्या परिसरात जमा झालेले शिवसैनिक आक्रमक झाले होते.सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांकडून शरद कोळी यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शरद कोळी हे सध्या अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.गेल्या दोन दिवसात धरणगाव,पाचोरा येथे त्यांच्या यात्रेनिमित्त सभा झाल्या आहेत.धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या मतदार संघातही सभा झाली यावेळी शरद कोळी यांनीही जोरदार भाषण केले. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करतांना कोळी यांनी गुर्जर समाजावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला याबाबत समाजातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले होते.
याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना जळगावात कुठेच भाषण करता येणार नाही असा आदेश काढला आहे.पोलिसांचे आदेश झुगारून शहर पोलीस ठाण्याबाहेरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले.शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली होती चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.मात्र त्यावेळी शरद कोळी पोलिसांच्या हाती लागले नव्हते ते पोलिसांना चकवा देऊन अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा आहे.