जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील जोश,उत्साह कायम ठेवला आहे त्यामुळे त्यांच्या भाषणाची उत्सुकता शिवसैनिकांना लागून राहिलीय.दरम्यान आता जिल्ह्या-जिल्ह्यांत उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत.धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आलीय.आता महाप्रबोधन यात्रेत आज मुक्ताईनगर इथे होणाऱ्या सुषमा अंधारेंच्या सभेलाही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे याबाबतचे आदेशही प्रशासनाने पारित केले आहेत.सुषमा अंधारेंची सभा रद्द झाल्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाने वातावरण आणखी तापलय.उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत.मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात धरणगाव येथे पहिली सभा त्यानंतर पाचोरा,एरंडोल तर काल चोपडा येथे सभा पार पडली.
धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कालच प्रशासनाने युवासेनेच्या शरद कोळींना भाषणबंदी तसेच जिल्हा बंदी केली होती त्यामुले शरद कोळींना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले.तर महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगरात सभा होत आहे.सुषमा अंधारेंच्या या सभेला देखील जिल्हा प्रशासनाने बंदी घातलीय.या बंदीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.प्रशासनाच्या या निर्णयावर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुक्ताईनगरातील महाप्रबोधन यात्रेच्या सुषमा अंधारेंच्या सभेला तसेच शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही महाआरतीच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.महाप्रबोधन यात्रेची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमांसाठी लावण्यात आलेले स्टेजही आता पोलिसांकडून काढण्यात आले आहेत.