पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील बस सेवा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या चाळीस मार्गांवर राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळास सेवा सुरू करण्यासाठी ‘पीएमपी’ने पत्र पाठविले आहे.एसटीची सेवा सुरू झाल्यानंतर त्या मार्गांवरील सेवा बंद केली जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ हद्दीत ‘पीएमपी’कडून १६५० बसमार्फत वाहतूक सेवा दिली जाते.दररोज १० ते १२ लाख प्रवासी ‘पीएमपी’तून प्रवास करतात.‘पीएमपी’कडून करोनाच्या काळात व एसटी संपाच्या काळात नागरिकांच्या मागणीवरून ग्रामीण भागात सेवा सुरू केली होती.एसटीची सेवा पूर्ववत होऊन आता सात महिने झाले तरीही ग्रामीण भागातील सेवा सुरू होती.बसची संख्या कमी असल्यामुळे दोन्ही महापालिका हद्दीतील नागरिकांना बस वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार नागरिकांकडून होत होती.याशिवाय ग्रामीण भागातील मार्गाचे अंतर जास्त असल्याने हे मार्ग तोट्यात चालत आहेत त्यामुळे ‘पीएमपी’चे नवीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाला पत्र पाठवून सध्या ‘पीएमपी’च्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या ४० मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे तसेच ‘पीएमपी’ प्रशासनाला या मार्गावरील ‘पीएमपी’ बस तत्काळ बंद न करता टप्या-टप्प्याने बसच्या फेऱ्या कमी करण्याची सूचना दिली आहे.एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या मार्गांवरील ‘पीएमपी’ बस बंद करण्यात येणार आहेत.
‘पीएमपी’कडून दोन्ही महापालिकाहद्दीत वाहतूक सेवेला प्राधान्य देण्यात येणार आहे.ग्रामीण भागात एसटीला सेवा सुरू करण्यासाठी पत्र दिले आहे.एसटीची सेवा सुरू होईपर्यंत ‘पीएमपी’ मार्ग तत्काळ बंद न करता सुरुवातीला फेऱ्या कमी करण्यात येतील.एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ‘पीएमपी’ बस बंद केल्या जातील असे ओमप्रकाश बकोरिया अध्यक्ष ‘पीएमपी’ यांनी कळविले आहे.