फसवणारेच खुर्चीत असले तर फसवणूक होणारच !
बनावट खत प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका
पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे भेट देऊन शेतकरी व शिवसैनिकांशी संवाद साधला. बनावट खतांसंदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यावर अहो सरकारच बनावट आहे त्यामुळे बनावट खतांचे सरकारला काहीच वाटणार नाही अशी टीका करत शेतकरी प्रश्नी आवाज उठविण्याचे आश्वासन देत बळीराजाला धीर व दिलासा दिला.शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात अंबादास दानवे यांनी शेतकरी व शिवसैनिकांच्या अडचणी समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधत विविध अडचणी व समस्या संदर्भात स्पष्टीकरण केले.याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे वैशाली सूर्यवंशी यांनी तर संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे प्रवीण पाटील,गणेश शिंदे,डॉ.योगेश पाटील यांनी श्री. दानवे यांचे स्वागत केले.तासाभराच्या या संवादात अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजावून घेतल्या व त्या संदर्भात उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारत योग्य त्या कारवाईचे आदेशित केले.
याप्रसंगी डॉ.हर्षल माने,वैशाली सूर्यवंशी,राजू राठोड (संभाजीनगर),ॲड.अभय पाटील,शरद पाटील,संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील,उद्धव मराठे,रमेश बाफना,ॲड. दीपक पाटील,अजय पाटील,भरत खंडेलवाल,पप्पू राजपूत,राजेंद्र राणा,राजेंद्र साळुंखे,आनंद संघवी,दत्ता जडे,खंडू सोनवणे,नरेंद्रसिंग सूर्यवंशी,दादाभाऊ चौधरी,शेतकरी सेनेचे अरुण पाटील,अनिल सावंत,अभिषेक खंडेलवाल,संदीप जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा व मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेस नाकारलेली परवानगी या संदर्भातील निषेधाचा ठराव ॲड.अभय पाटील यांनी मांडला त्यास उद्धव मराठे यांनी अनुमोदन देऊन आवाजी मतदानाने हा निषेधाचा ठराव पारित करण्यात आला.याप्रसंगी शेतकरी सेनेचे अरुण पाटील यांनी खडकदेवळा (ता. पाचोरा) येथे सापडलेल्या बनावट खतसाठ्याचा प्रश्न मांडत संबंधितांना अटक करण्याची मागणी केली.रमेश बाफना व शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच कपाशीवरील लाल्या रोगाची भरपाई मिळावी व कृषीपंपांचे वीजबिल माफ करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन दिले.तसेच ओला दुष्काळामुळे नुकसान झालेले असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही असे बेजबाबदार वक्तव्य करतात या वक्तव्याचा ही निषेध करण्यात आला.निलंबित पोलिस निरीक्षक बकाले यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.ॲड.अभय पाटील यांनी पाचोरा पालिकेतील विकास कामे व ठराविक ठेकेदारांनाच दिली जाणारी कामे याची चौकशी करावी.आठ भूखंडाचे रद्द करण्यात आलेले आरक्षण व त्या आधारे कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा रचलेला घाट या संदर्भात श्री. दानवे यांना माहिती दिली.डॉ.हर्षल माने यांनी पीकविम्याचा विषय मांडून राजकीय दबावापोटी सुषमा अंधारे यांच्या सभेस परवानगी नाकारण्यात आल्याचे स्पष्ट केले.
शिवसैनिक व उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेतल्यानंतर अंबादास दानवे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले.शिवसेनेतून एक ते दहा टक्के स्वार्थी गेलेले आहेत खरे शिवसैनिक आहे तेथेच आहेत.बनावट खतांसंदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की राज्यातील सरकारच बनावट आहे त्यामुळे खते बनावट मिळणारच.फसवणारेच खुर्चीत असले तर फसवणूक होणारच हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ‘आनंदाचा शिधाबाबत सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.रमेश बाफना यांनी प्रास्ताविक केले तर ॲड.अभय पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.