मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर भाजपकडून अभिनंदनाऐवजी टीकेचा मारा सुरु झाला आहे यामध्ये भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे.शेलार यांनी ट्विट करून म्हटले आहे की भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय.ऋतुजाताईंचे अभिनंदन!!काँग्रेस,राष्ट्रवादी,भाकप डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले,ना मते जास्त मिळाली.भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे त्यामुळे आता या टीकेला ठाकरे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली.पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके आघाडीवर होत्या.
ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मते मिळाली तर नोटाला १२ हजार ७७८ मते मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.ऋतुजा लटके यांच्या विजयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिंदेंच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणला आहे.मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंचा खूप महत्वाचा आणि बळ देणारा ठरण्याची शक्यता आहे.या पोटनिवडणुकीनंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला मिळालेली मते ही भाजपची असल्याचा दावा केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत हाच सूर लावला.भाजपच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पोटनिवडणूक लढवली असती तरी आता नोटाला जितकी मते पडली आहेत तेवढीच मते भाजपला मिळाली असती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मशाल हे चिन्हा घेऊन पहिला विजय मिळवला आहे.पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह घेऊन शिवसैनिकांनी पोटनिवडणुकीत जो प्रचार केला,काम केले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी पैसे देऊन नोटाचा प्रचार केला जात होता.कायद्यानुसार नोटाचा प्रचार करता येत नाही.नोटाचा वापर हा ऐच्छिक आहे.ज्याला वाटते वरीलपैकी कोणताही उमेदवार योग्य नाही त्याला नोटाचे बटण दाबण्याचा अधिकार आहे.मात्र निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी पैसे देऊन नोटाचा प्रचार सुरु होता.आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती.मी स्वत: निवडणूक आयोगाकडे नोटाचा प्रचार सुरु असतानाचा व्हिडिओ दिला होता.लेखी सूचनाही दिली होती मात्र पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे नोटाला मिळालेली मते ही गैरमार्गाने मिळवण्यात आली आहेत असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.