हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यात आज भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे.एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.हिमाचल प्रदेशमध्ये मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.१२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर १२ डिसेंबर रोजी निकाल आहे मात्र त्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर,भाजपचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग भाजपचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे यावेळी उपस्थित होते.काँग्रेस सोडणाऱ्या २६ नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री ठाकूर यांनी भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता.राज्यातील जनता पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवते तसेच जे.पी नड्डा यांनी मुख्यमंत्री ठाकूर यांचे कौतुकही केले आहे.