यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे नेमणुक असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने तालुक्यातील सुरू असलेली सर्व शासकीय निधीतील कामांवर कुणाचे ही नियंत्रण नसल्याने कामे ही सर्व राम भरोसे सुरू असुन कामांची गुणवत्ता धोक्यात आल्याचे दिसुन येत आहे.अधिकारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे तालुकावासीयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावल तालुका हा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८४ गावे येतात.यात तालुक्याचे विभाजन झाल्यापासुन चोपडा विधानसभा व रावेर विधानसभा क्षेत्राचे दोन अशी आमदार असुन शासकीय निधीतुन मोठया प्रमाणावर विविध विकास कामे होत असुन यातील अनेक विकासकामे ही अत्यंत निकृष्ट प्रतिचे करण्यात येत आहेत.अशात तालुक्याच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असुन दोन तालुक्यातील कामांचा व्याप या दृष्टीकोणातुन सदर अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे.शासकीय नियमानुसार नेमणुकीस असलेल्या ठीकाणीच(मुख्यालयी)अधिकारी यांनी राहावे असे नियम असुन याकडे दुर्लक्ष करून जबाबदार अधिकारी हे यावलच्या मुख्यालयातील शासकीय निवासस्थानी राहात नसल्याने तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या शासकीय कामांच्या गुणवत्तेवर कुणाचे ही नियंत्रण राहीले नसल्याचे दिसुन येत आहे.याशिवाय तालुक्यातील कामांच्या तक्रारी घेवुन येणाऱ्या विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांना तक्रारीचे निवारण सक्षम अधिकारी नसल्याने कारणाने समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.तरी संबंधितांनी तूर्त लक्ष पुरून हि समस्या सोडवावी अशी मागणी तालुकावासीयांनी केली आहे.