‘खोके सरकार’म्हटल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार ! विजय शिवतारे यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
‘खोके सरकार’ म्हणणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.खोके सरकार म्हणणाऱ्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली जाणार आहे.‘पन्नास खोके,एकदम ओके’ यासारख्या आरोपांमुळे सरकारविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये विनाकारण संभ्रम पसरत असल्याने कायदेशीर लढाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे व आरोप करणाऱ्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात अडीच हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्त्ये विजय शिवतारे यांनी मंगळवारी दिला आहे.एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली पण भाजपसोबत जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.५० खोके,एकदम ओक्के असा आरोप केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर शिवतारे बोलत होते.राज्यातील सरकराविरोधात सकाळ,संध्याकाळी पन्नास खोक्यांवरून आरोप होत आहे हे कुठे तरी थांबावेत यासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांबरोबर याबाबत चर्चा झाली असून आता याविरोधात आम्ही कायदेशीर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या या आरोपांमुळे विनाकारण सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ५० खोक्यांवरून आरोप केले आहेत. मात्र हे आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, असे आमचे आव्हान आहे. मात्र त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा शिवतारे यांनी यावेळी दिला. पुरावे नसताना आरोप केले जात आहेत, त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जी शिवराळ भाषा वापरली ती त्यावरची प्रतिक्रिया होती. त्यामुळे आता मानहानीच्या दाव्याला सामोरे जा किंवा माफी मागा, असेही शिवतारे म्हणाले. ५० आमदार गुणिले ५० कोटी असे एकूण २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे केले जातील. त्यांना उद्या नोटीस दिली जाईल, असेही शिवतारे यांनी सांगितले.