दारुड्या पतीकडून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन खून
तीन महिन्याच्या मुलासह तीन मुले पडली उघडे
जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जालना शहराजवळील सूतगिरणी कुंभेफळ शिवारातील एका दारूड्या पतीने माहेरी राहत असलेल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयीपणाने खून केला ही घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली मयत महिलेचे नाव रमाबाई संदीप कदम (रा. नुतनवाडी ता.जालना)असे आहे.निर्दयीपणे खून झालेल्या या महिलेस ३ चिमुकली मुले असून ते आता उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कुंभेफळ येथील भागाजी वैताळराव आचलखांब यांची मुलगी रमा हिचा काही वर्षापूर्वी नुतनवाडी येथील संदीप भीमराव कदम याच्यासोबत विवाह झाला.विवाहानंतर रमा हिस ३ मुले झाली पैकी एक मुलगा ३ महिन्याचाच आहे.संदीप कदम यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी दारूच्या नशेत तिला मारझोड करीत होता.एक महिन्यापूर्वी संदीपने रमाला बेदम मारहाण केली होती. दररोजच्या त्रासाला कंटाळून रमा हिने शिवारातील एका विहिरीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्नही केला होता.हा प्रकार माहीत झाल्यानंतर माहेरच्या आचलखांब कुटुंबीयांनी रमाबाई व तिच्या तिन्ही मुलांना कुंभेफळ येथे आणले होते.गेल्या १ महिन्यापासून रमा व मुले कुंभेफळ येथे माहेरी राहत होते.काल १० नोव्हेंबर रोजी सकाळी संदीप कदम कुंभेफळ येथे आला त्यानंतर दुपारच्या सुमारास रमा ही घरात एकटी असल्याची संधी साधून त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून निर्घृन हत्या केली व निर्दयीपणे तिला तिथेच सोडून पसार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत ही माहिती सर्व पोलिस स्टेशन,स्थानिक गुन्हे शाखेला कळवली त्यानंतर आरोपींचा शोध सुरू केला असता आरोपी संदीप हा बस स्टँडवर असल्याची माहिती मिळाली त्यानंतर एका पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रमेश जायभाय यांनी दिली आहे.रमाचे वडील व भाऊ यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात संदीप कदम (रा. नुतनवाडी ता.जालना) याच्याविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दारुड्या संदीप याने रमा हिला संपवले मात्र त्याची तीनही मुले आता उघड्यावर पडली असून अचलखांब परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.