मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील जमिनीच्या बक्षीसपत्राची नोंद सात-बारावर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अलिबागच्या महिला तहसीलदार मीनल दळवी यांच्यासह एजंट राकेश चव्हाण याला शनिवारी रायगडच्या विशेष न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.तहसीलदाराच्या भाडेतत्त्वावरील घरातून ७६ हजार रुपयांची रोकड,६० तोळे सोने तर विक्रोळीच्या घरातून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी एजंट राकेश चव्हाण,तहसीलदार मीनल दळवी यांना अटक केली होती. तक्रारदार अलिबाग येथील रहिवासी असून त्यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षीसपत्राच्या नोंदणीचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित होते. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे प्रथम पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.तडजोडीअंती तीन लाख रुपये मागितले अखेर दोन लाख रुपये देण्याचे ठरले ही रक्कम राकेश चव्हाण याच्याकडे द्यायची होती तक्रारीची खातरजमा झाल्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी राकेश चव्हाण याला अलिबाग शहरात दोन लाख रुपये स्वीकारताना पकडले. यावेळी त्याने तहसीलदाराचे नाव सांगितल्याने पथकाने त्यांना त्यांच्या गोंधळपाड्यातील निवासस्थानातून संध्याकाळी ताब्यात घेतले मात्र मीनल दळवी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.बेशुद्ध पडल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले शनिवारी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.