मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना पक्षाबद्दलचा वाद प्रलंबित असतानाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर उद्या सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम आदेश आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी काढला होता त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी तातडीने १० ऑक्टोबरला दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर असल्याने खुल्या निवडणूक चिन्हांतील प्रत्येकी तीन पर्याय देण्यास आयोगाने उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांना सांगितल्यानंतर दोन्ही गटांनी तसे दिले आणि त्यातील एकेक चिन्ह आयोगाने दोन्ही गटांना दिले.
निवडणूक आयोगाने नैसर्गिक न्यायतत्त्वांचे उल्लंघन केले आणि आम्हाला आमची बाजू योग्यपणे मांडू न देताच घाईघाईत पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आयोगाकडे केलेली याचिका सुनावणीयोग्यच नव्हती याशिवाय शिंदे यांचा गट पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून आधीच स्पष्ट झाले होते.शिंदे यांना पक्षाबाबत बहुमत असल्याचे दाखवता आले नव्हते उलटपक्षी आम्ही ते दाखवले होते.पक्षावर नियंत्रण व वर्चस्व असल्याच्या दोन्ही गटांच्या दाव्याबाबतच्या स्थितीत १९ जुलै ते ८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कोणताही बदल झालेला नव्हता असे असताना केवळ अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाल्याच्या कारणाखाली आणि शिंदे गट उमेदवार उभा करणार नसल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून स्पष्ट झाले असताना आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याचा घेतलेला निर्णय हा मनमानी व बेकायदा स्वरूपाचा आहे असे म्हणणे उद्धव ठाकरे यांनी याचिकेत मांडले आहे.